विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडी आणि महायुतीमधील पक्षाच्या नेत्यांमध्ये सध्या बैठकांचा धडाका सुरु आहे. अनेक नेते आपल्याला खात्रीशीर तिकीट नाही मिळणार हे लक्षात येताच एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धक्क्यावर धक्के बसत आहेत.
आ. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेश करत अजित पवारांना धक्का दिला आहे. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज मुंबईत शरद पवार, जयंत पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.
गेल्या काही दिवसांपासून डॉ.राजेंद्र शिंगणे हे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. याच अनुषंगाने डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांची भेट देखील घेतली होती. यानंतर त्यांनी प्रतिक्रिया देत मतदारसंघातील नागरिकांच्या आणि कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेत आपण पुढचा निर्णय घेणार असल्याचं सूचक विधान केलं होतं.
त्यानंतर आज अखेर डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी शरद पवार यांच्या गटात प्रवेश केला.