राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय निवसास्थान असलेल्या वर्षा बंगल्याबाहेर एका तरुणाने जीव देण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्याबाहेर काही आरोग्य विभागाचे विद्यार्थ्यी आंदोलन करत होते. मुख्यमंत्र्यांची भेट व्हावी अशी या आंदोलकांची मागणी होती. मात्र, मुख्यमंत्र्यांची भेट मिळत नसल्यामुळे यातील एका संतापलेल्या तरुणाने अंगावर पेट्रोल ओतून घेत जीव देण्याचा प्रयत्न केला.
यानंतर पोलिसांनी 30 ते 40 तरुणांना ताब्यात घेतले आहे.
"आरोग्य विभाग पदभरतीचा निकाल जाहीर होऊन आज जवळपास आठ महिने होत आले आहेत. तरीसुद्धा आतापर्यंत आरोग्य विभागाने आम्हाला नियुक्ती आदेश मिळालेले नाहीत. सर्व मंत्र्यांसह आरोग्य विभागाला याची कल्पना असुनही आमची फरफट चालू आहे. नियुक्ती मिळावी यासाठी सर्व निवड झालेले उमेदवार याबाबत पाठपुरावा करुनही कोणतीही हालचाल होत नाही," असे वर्षाबाहेर घडलेल्या घटनेनंतर एका उमेदवाराने सांगितले.
दरम्यान येत्या काही दिवसांत विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहीता लागण्याची शक्यता आहे. जर आचारसंहीता लागली तर नियुक्ती आदेश मिळणार नाहीत अशी भीती उमेदवारांना वाटत आहे.