विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर केली जात आहे. महायुतीमधील भाजपने पहिली उमेदवारी यादी जाहीर केली. आज अजित पवार गटाची पहिली यादी जाहीर होणार आहे. तर महाविकास आघाडीची देखील उमेदवार यादी आज जाहीर होणार आहे. अशामध्ये राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीचे टेन्शन वाढले आहे. राज्यात तिसरी आघाडी तयार झाली असून परिवर्तन महाशक्तीने पहिली उमेदवार यादी आज जाहीर केली.
परिवर्तन महाशक्तीने १० उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेत ही उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली आहे. परिवर्तन महाशक्तीने अचलपूर, रावेर, चांदवड, राजुरा, एरोली, देंगलुर, शिरोळ आणि मिरज मतदारसंघातील उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. अचलपूरमधून बच्चू कडू यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मिरज आणि शिरोळ हे दोन मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्यात आले आहेत पण त्याठिकाणी उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली नाही.
बच्चू कडू यांनी यावेळी सांगितले की, 'आज आम्ही नावं जाहीर करतोय. एकत्रित नावं जाहीर करतोय बाकी पक्षांसारखं करत नाही. वैचारिक परिवर्तन आम्ही करतोय. यावेळी 'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात पण उमेदवार आम्ही देऊ. जिथे चांगले उमेदवार मिळतील तिथे नक्की उमेदवारी देणार आहोत. चांगले उमेदवार मिळाले तर नक्की मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या विरोधात उमेदवारी आम्ही देणार आहोत. २८ तारखेला मी उमेदवारीचा फॉर्म भरणार आहे.', असे देखील बच्चू कडू यांनी सांगितले.
दरम्यान संभाजी राजे यांनी सांगितले की, १५० उमेदवारांच्या बाबत आमचं एकमत झालं होतं. आज सुद्धा परिवर्तन महाशक्तीची बैठक झाली. पुढचे टप्पेसुद्धा ठरवले गेले. महाराष्ट्रात परिवर्तन आम्हाला घडवायचे आहे. आज १० नावं आम्ही जाहीर केली.
उमेदवारांची यादी -
- अचलपूर - बच्चू कडू - प्रहार जनशक्ती पक्ष
- रावेर यावल - अनिल चौधरी - प्रहार जनशक्ती पक्ष
- गणेश निंबाळकर - चांदवड - प्रहार जनशक्ती पक्ष
- सुभाष साबणे - देगलूर - प्रहार जनशक्ती पक्ष
- अंकुश कदम - एरोली - महाराष्ट्र स्वराज्य पक्ष
- माधव देवसरकर - हदगाव हिमायतनगर - महाराष्ट्र स्वराज्य पक्ष
- गोविंदराव भवर - हिंगोली - महाराष्ट्र राज्य समिती
- वामनराव चटप - राजुरा - स्वतंत्र भारत पक्ष
- शिरोळ -स्वाभिमानी शेतकरी संघटना
- मिरज - स्वाभिमानी शेतकरी संघटना