विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. राज्यभरात प्रचारसभांचा धडाका सुरू आहेत. यावेळी सत्तेत आल्यानंतर काय काय केलं जाईल याबाबतची आश्वासनं महायुती आणि महाविकास आघाडीकडून मतदारांना दिली जात आहेत. त्याचसोबत उमेदवार देखील मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळी आश्वासनं देत आहेत. अशामध्ये बीडमधील भाजपच्या उमेदवाराने तर नागरिकांना अजब आश्वासन दिले आहे.
'मला आमदार करा, एका वर्षात सगळे डुक्कर मारून टाकतो.', असं वक्तव्य भाजपचे उमेदवार सुरेश धस यांनी केले आहे. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
परळीचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्या अजब आश्वासनानंतर आता महायुतीचे आष्टी मतदार संघाचे उमेदवार सुरेश धस यांनी मतदारांना एक अजब आश्वासन दिले आहे. आपल्याकडे डुकरांची संख्या वाढली आहे यामुळे शेतकरी त्रस्त झालेत. या आधी मी पंकजा मुंडे मंत्री असताना त्यांच्या वाढदिवसानिमित्त डुक्कर मारण्यासाठी नवाब हा शूटर आणला होता. आता सुद्धा डुक्कर मोठ्या संख्येत वाढले आहेत.
त्यामुळे मला आमदार करा. एक वर्षात हे सगळे डुक्कर मारून टाकतो , असे अजब सुरेश धस यांनी दिले आहे. त्यांच्या या सभेची जोरदार चर्चा रंगली आहे.