नांदेड : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरु झाली आहे. यंदा महाविकासआघाडी विरुद्ध महायुती अशी लढत निवडणुकीत दिसणार आहे. सध्या राज्यात सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु आहे. तसेच प्रचाराचा धुराळाही उडताना दिसत आहे. प्रत्येक मतदारसंघाकडून उमेदवारांकडून प्रचारसभा घेण्यात येत आहे.
याचदरम्यान काही उमेदवार आणि राजकीय नेत्यांची वादग्रस्त वक्तव्ये समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी मराठा समाजाला उद्देशून वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.
त्यानंतर आता नांदेडमधील भाजप उमेदवाराचं वादग्रस्त वक्तव्य समोर आलं आहे. नांदेडमध्ये भाजप नेत्या, आमदार पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत भाजप किनवटचे आमदार भीमराव केराम यांनी वादग्रक्त वक्तव्य केलं आहे. किनवट मतदारसंघाचे भाजप उमेदवार केराम यांच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
भाजप उमेदवार भीमराव केराम यांच्या प्रचारार्थ पंकजा मुंडे यांची किनवटच्या बोधडी येथे सभा आयोजित केली होती. त्यावेळी केलेल्या आमदार केराम यांच्या वक्तव्याची मोठी चर्चा होत आहे.
भीमराव केराम काय म्हणाले?
एका वृत्त संस्थेने दिलेल्या वृत्तानुसार , 'रोज रोज गावात येऊन तुमचे काय मुके घ्यायचे का? असे बेताल वक्तव्य भाजपचे नांदेड जिल्ह्यातील किनवटचे उमेदवार भीमराव केराम यांनी केलं आहे. विशेष म्हणजे भाजप नेत्या आमदार पंकजा मुंडे यांनी व्यासपीठावर उपस्थित असताना आमदार भीमराव केराम यांनी हे बेताल वक्तव्य केलं आहे. भीमराव केराम गावात फिरत नाहीत, असा आरोप त्यांच्यावर होत असतांना केराम यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.