राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून सर्वच पक्षांचे प्रमुख नेते प्रचारसभांसाठी महाराष्ट्र फिरत आहेत. दरम्यान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात विधानसभा निवडणुकांसाठी प्रचारसभांना सुरुवात केली आहे.
उद्धव ठाकरे यांची आज वणी येथे सभा होत आहे. या सभेसाठी ठाकरे हेलिकॉप्टरने गेले आहेत, यावेळी हेलिपॉडवर उतरताच निवडणूक अधिकाऱ्यांनी ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर यांची बॅग तपासल्याचे समोर आले आहे. दरम्यान, यानंतर सभेत उद्धव ठाकरे संतापल्याचे पाहायला मिळाले. यावेळी त्यांनी महायुतीवर जोरदार निशाणा साधला.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
मी हेलिकॉप्टरने आलो तेव्हा आठ, दहा जण माझ्या स्वागतासाठी आले होते. म्हटलं काय करायचं आहे. ते म्हणाले, बॅग तपासायची आहे, मी म्हणालो तपासा. त्यांचा व्हिडीओ काढला आहे. एक लक्षात घ्या तुम्हाला कुठेही चौकशीसाठी किंवा तपासणीसाठी अडवले तर त्यांचीही चौकशी करा. ते कुठे नोकरीला आहेत हे तपासा. जसे ते आपले खिसे तपासतात तसे त्यांचेही तुम्ही खिसे तपासा कारण हा आपला अधिकार आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
"मी यंत्रणेला सांगत आहे की मी अजिबात रागावलो नाही. तुम्ही तुमच काम करताय, मी माझ काम करतोय. यानंतर मी त्याला म्हणालो मोदी आणि शाहांची बॅग तपासली का? एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांची बॅग तपासायला हवी की नको?, असा सवाल करत टोलाही लगावला.