नाशिक (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी एकसंघपणे काम केल्याने नाशिकसह राज्यात घवघवीत यश मिळाले. महाविकास आघाडीचे सरकार राज्यात यावे तसेच भयमुक्त नाशिकसाठी विधानसभा निवडणुकीतही काँग्रेस एकसंघपणे रिंगणात उतरलेली असून मध्य विधानसभा मतदारसंघातील शिवसेना (उबाठा) उमेदवार वसंत गिते यांच्या विक्रमी विजयासाठी काँग्रेसजन सज्ज असल्याची ग्वाही शहर (जिल्हा) काँग्रेसच्या बैठकीत देण्यात आली.
विधानसभेच्या नाशिक मध्य मतदारसंघातील शिवसेना (उबाठा) व महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत गिते यांच्या प्रचारार्थ काँग्रेस कमिटीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत शिवसेना (उबाठा), काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार आणि घटक पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना माजी आमदार वसंत गिते यांनी शहराचा विकास व भयमुक्त नाशिकसाठी उमेदवारी करत असल्याचे नमूद केले. लोकसभा निवडणुकीत एकसंघ प्रमाणे काम केल्याने विजय सुकर झाला. यात काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सिंहाचा वाटा असल्याचे नमूद केले.
तसाच पुढाकार विधानसभा निवडणुकीत घेतल्यास महाविकास आघाडीचा विजय निश्चित असल्याचे सांगताना हेमलता पाटील, राहुल दिवे यांनी माघारी घेऊन प्रचारात सक्रीय सहभाग घेतला ते कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार काढले. शहराचा विकास खुंटला आहे, गुन्हेगारी वाढली, ड्रग्जचा विळखा वाढतोय त्यामुळे तरुणाई संकटात आहे. बेरोजगारीचा प्रश्नही दिवसेंदिवस गंभीर होत आहे. या पार्श्वभूमीवर आपले शहर भयमुक्त होण्यासाठी संघटीतपणे निवडणुकीला सामोरे जावू तसेच राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आणण्यासाठी कटीबद्ध व्हा, असे आवाहन श्री. गिते यांनी केले.
खासदार राजाभाऊ वाजे यांनी, लोकसभा निवडणुकीतील विजयाची पुनरावृत्ती घडवण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत गिते यांच्या पाठीशी काँग्रेससह घटक पक्षांची ताकद एकवटली असल्याचे नमूद केले. लोकसभेतील विजयात काँग्रेसचा सिंहाचा वाटा होता. तशीच ताकद वसंत गिते यांच्या पाठीशी उभे करण्याचे आवाहन खा. वाजे यांनी केले. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर यांनी राज्यात महाविकास आघाडी सरकार आणायचे आहे.
त्यासाठी उमेदवार वसंत गिते यांच्या विजयासाठी काँग्रेस कटीबद्ध असल्याची ग्वाही दिली. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारने राज्याचा विकास साधला. कोरोनात महाराष्ट्राचा कुटुंबाप्रमाणे सांभाळ केला. राज्यात जातीनिहाय जणगणनेसाठी महाविकास आघाडीचे सरकार येणे गरजेचे असून महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत गिते यांचा विजय निश्चित असल्याचे नमूद केले.
काँग्रेस शहराध्यक्ष आकाश छाजेड यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत गिते यांच्या पाठीशी काँग्रेस पक्ष ठामपणे उभा असल्याची ग्वाही दिली. महायुतीचे महाभ्रष्ट सरकार हटविण्यासाठी तसेच संविधान वाचवण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार येणे ही काळाची गरज आहे. महिलांवरील वाढते अत्याचार, बेरोजगारी, ड्रग्जचा विळखा आदी प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ता एकदिलाने वसंत गिते यांच्या विजयासाठी मैदानात उतरल्याचे नमूद केले. याप्रसंगी 'एआयसीसी' चे रॉय, काँग्रेसचे राहुल दिवे, राजेंद्र बागुल, बबलू खैरे आदींची भाषणे झाली.
व्यासपीठावर खा. डॉ. शोभाताई बच्छाव, शिवसेना प्रदेश संघटक विनायक पांडे, माजी महापौर यतीन वाघ, दत्ता गायकवाड, पश्चिम विधानसभा मतदारसंघातील उमेदवार सुधाकर बडगुजर, सिराज कोकणी, भगवान भोगे, वत्सलाताई खैरे, स्वाती जाधव, सुभाष नहार आदी उपस्थित होते.
यावेळी उल्हास सातभाई, समीर कांबळे, माजी उपमहापौर गुलाम शेख, संदीप शर्मा, संपतराव जाधव, विजय राऊत, युनुस शेख, भालचंद्र पाटील, मुन्ना ठाकूर, बाळासाहेब पाठक, सचिन बांडे, अनिल बेग, ज्युली डिसुझा तसेच प्रदेश पदाधिकारी, सर्व नगरसेवक, ब्लॉक अध्यक्ष, काँग्रेस सेवादल, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, एनएसयुआय, अल्पसंख्याक विभाग, अनुसूचित जाती-जमाती विभाग,ओबीसी विभाग, इंटक, असंघटित कामगार काँग्रेस व सर्व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.