महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीकडे साऱ्या देशाचे लक्ष लागले आहे. बहुतांश एक्झिट पोल हे महायुतीच्या बाजुने आहेत. असे असले तरी निकालाच्या दोनच दिवसांनी आधीच्या विधानसभेची मुदत संपत असल्याने जर अटीतटीच्या लढतींत कोणालाच बहुमत मिळाले नाही तर सरकार स्थापन होणे अशक्य आहे. यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केली जाण्याची शक्यताही राजकीय वर्तुळात वर्तविली जात आहे.
दरम्यान निकालाच्या आधीच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांना केवळ 48 तासांचा कालावधी असणार आहे. या काळात सत्ता स्थापन करण्यात यश आलं नाही तर राज्यात गेल्या निवडणुकीसारखं राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता आहे.
निवडणुकीच्या निकालानंतर केवळ 48 तास असल्याने प्रत्येक पक्षासाठी ते 48 तास जास्त आव्हानाचे असणार आहेत. विशेष म्हणजे मतदानानंतर विविध संस्थांचे सर्व्हेचे आकडे जाहीर करण्यात आले आहेत.
एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, राज्यात सत्ता स्थापनेत महाविकास आघाडी आणि महायुतीत चुरस असणार आहे. या निवडणुकीत अपक्षांची भूमिका ही जास्त महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे.
त्यामुळे अपक्षांची बार्गेनिंग पावर वाढणार आहे. अशा परिस्थितीत अपक्षांची मनधरणी करणं, संख्यांची जुळवाजुळव करण्याचं आव्हान राजकीय पक्षांना असणार आहे. विशेष म्हणजे हे सर्व केवळ 48 तासांतच करावं लागणार आहे.
हॉटेल पॉलिटिक्स होणार?
एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात अपक्षांची भूमिका महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही शक्यता खरी ठरल्यास सत्ता स्थापनेचा कालावधी वाढू शकतो. अशावेळी आपल्या आमदारांना सांभाळून ठेवणं, एकत्र ठेवणं, आमदार फुटू न देणं, याचंदेखील आव्हान राजकीय पक्षांना असणार आहे. अशा परिस्थितीत महाविकास आघाडी आणि महायुतीचे घटक पक्ष दुसऱ्या राज्यातील पंचतारांकीत हॉटेलमध्ये आपापल्या आमदारांना ठेवण्याची शक्यता आहे.
राज्यपालांची भूमिका महत्त्वाची ठरणार
दरम्यान, युती-आघाडीऐवजी सर्वात मोठा पक्ष म्हणून सरकार स्थापनेचं निमंत्रण देण्याचा सर्वस्वी अधिकार राज्यपालांना आहे. निकालाचा कौल अस्पष्ट आल्यास राज्यपाल पहिल्यांदा सत्ता स्थापनेचं आमंत्रण कुणाला देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
राज्यातील सध्याच्या विधानसभेची मुदत ही येत्या 26 नोव्हेंबरला रात्री 12 वाजता संपणार आहे. त्यामुळे 26 तारखेला 12 वाजेपर्यंत सरकार स्थापन न झाल्यास रात्री 12 वाजेपासून पुन्हा राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता आहे. निकालानंतर बहुमतासाठी आधी कोण दावा करतं, राज्यपाल कुणाला बोलवतात, हे दोन मुद्दे जास्त कळीचे ठरणार आहेत.