धस-क्षीरसागर-सोनवणे या  त्रिमुर्तींचा मुंबईला कूच करण्यााचा  निर्णय ;
धस-क्षीरसागर-सोनवणे या त्रिमुर्तींचा मुंबईला कूच करण्यााचा निर्णय ; "या" तारखेला मुंबईत निघणार सर्वपक्षीय मोर्चा
img
Dipali Ghadwaje
मुंबई : अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे अधिवेशन शिर्डी येथे पार पडले. वाल्मिक कराडमुळे चहूबाजूंनी कोंडीत सापडलेले मंत्री धनंजय मुंडे यांनीही या अधिवेशात हजेरी लावली. एका विशिष्ट समाजाला लक्ष्य करण्यात येत असल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. तसेच पक्षासाठी केलेल्या कामांचा पाढा वाचून कारवाई करू नका असेच त्यांनी अप्रत्यक्षपणे पक्षनेतृत्वाला सांगितले.

प्रांताध्यक्ष सुनील तटकरे यांनीही धनंजय मुंडे यांची कड घेऊन मेहनती धनुभाऊ म्हणत त्यांची पाठराखण केली. कित्येक आरोप होऊनही राष्ट्रवादी पक्ष धनंजय मुंडे यांची पाठराखण करतो आहे, हे लक्षात घेऊन भाजप आमदार सुरेश धस, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर आणि बीडचे खासदार बजरंग सोनवणे या त्रिमुर्तींनी आता मुंबईला कूच करण्यााच निर्णय घेतला आहे.

संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ येत्या २५ तारखेला मुंबईत धडकून धनंजय मुंडे यांना घेरण्याची रणनीती सर्वपक्षीय नेत्यांनी आखली आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख आणि परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ महाराष्ट्रात सर्वपक्षीय मोर्चे निघत असताना आता मुंबईतही मोर्चाचे नियोजन आखण्यात आले आहे.

मुंबईतील मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान या मार्गावर २५ तारखेला मोर्चा होणार आहे. या मोर्चात सर्वपक्षीय नेत्यांचा सहभाग असेल.  सुरेश धस यांनी देशमुख हत्या प्रकरणात सतत आक्रमक भूमिका आका आणि त्यांचे आका म्हणत हल्लाबोल सुरुच ठेवला आहे. वाल्मिक कराड पुन्हा तुरुंगाबाहेर येणार नाही, असे सांगत असताना धनंजय मुंडेही तुरुंगात जाऊ शकतात, अशी शक्यताही ते सभांमधून बोलून दाखवत आहेत. बीड, परभणी, जालना, धाराशिव आणि पुण्यानंतर आता सर्वपक्षीय मोर्चा मुंबईतमध्ये पार पडणार आहे.

आंबेडकरी संघटनांकडून लाँग मार्च, मुंबईत शेवट

सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे या दलित कार्यकर्त्यांच्या बळी प्रकरणात पीडितांना न्याय देण्याच्या मागणीकरिता परभणी ते मुंबई हा लाँग मार्च २५ जानेवारी रोजी मुंबईत पोहोचत आहे. या लाँग मार्चमध्ये सुमारे तीन हजार कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला आहे. लाँग मार्चच्या शेवटाला भीम आर्मीचे नेते, खासदार चंद्रशेखर आझाद यांचीही विशेष उपस्थिती असणार आहे.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group