मराठा आरक्षणाच्या मागणीवरून राज्यभरात तीव्र आंदोलन करण्यात येत आहेत. मराठवाड्यात या आंदोलनाला हिंसक वळण लागले असून अनेक ठिकाणी गाड्यांची जाळपोळ रास्ता रोको आंदोलन करण्यात येत असल्याने कायदा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर या मराठा आरक्षणासाठी आज बुधवारी सह्याद्री अतिथीगृहात सर्वपक्षीय चर्चा झाली. मराठा आरक्षणासाठी सरकार दरबारी हालचालींना वेग आला आहे.
याचदरम्यान, गेल्या आठ दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. 'तुम्ही इथे चर्चा करायला या. सांगा कसं आणि कधी आरक्षण देतात, होऊ द्या दूध का दूध.. पानी का पानी, असं आवाहन मनोज जरांगे यांनी राजकीय नेतेमंडळींना केलं आहे.
मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. मराठा आरक्षणासाठी आज बुधवारी सर्व राजकीय पक्षांची बैठक झाली. या बैठकीवर मनोज जरांगे म्हणाले, 'सरसकट मराठ्यांना आरक्षण देणार का? त्यांचा तपशील माझ्याकडे आला नाही, ते जाणून घेण्याची इच्छा नाही. मराठा समाजाच्या लेकरांची मुडदे पडायला लागले आहेत. हे सर्व सरकारच्या हस्ते आहे. आम्ही विचार करून सांगतो, वेळ पाहिजे का? कशासाठी पाहिजे हे आम्ही पाहतो'.
'वेळ मागता पण अगोदर का वाढवून घेतला नाही. तुम्हाला वेळ कशासाठी ? का? किती पाहिजे? त्यांनी काढलेला अध्यादेश आम्हाला मान्य नाही, तो रद्द करावा. तुम्ही शहाणे असाल तर तो रद्द करा. हे आंदोलन आरक्षण मिळेपर्यंत थांबू शकत नाही, असेही ते म्हणाले.
'माझं रक्त अटू न देता... ८,१० दिवस आणि वेळ मागतात. त्यांना वेळ कशासाठी पाहिजे, ते महाराष्ट्रातील मराठ्यांना सरसकट आरक्षण देणार का? ते इथे येऊन बोलावं. आम्हला कळू द्या, त्यांच्या मनात काय आहे? इथे या..आम्ही चार दिवसांपासून म्हणतोय, इथे या... बोलावलं तरी येत नाही.. यांना काड्या करायची सवय आहे, अशी टीका जरांगे यांनी केली.
'तुम्ही म्हणता वेळ द्या... तुम्ही मराठ्यांना आरक्षण कसं देणार, ते इथे येऊन सांगा, मग विचार करू. तेव्हा देखील सर्व पक्ष होते. आज देखील सर्व पक्ष आहेत. हे सर्व आतून एकच आहेत, हे मराठ्यांना वेडयात काढतात. चला तुम्ही या इथे चर्चेला आणि सांगा कसं आणि कधी आरक्षण देतात. होऊ द्या दूध का दूध .. पानी का पानी, असे जरांगे म्हणाले.
'काय पाहिजे, कसं पाहिजे, कधी देणार, कस देणार हे सविस्तर सांगा मग वेळ देऊ. आता कशाला वेळ पाहिजे, समोर येऊन सांगा,अन्यथा पाच मिनिटे मिळणार नाही, 2-3 पाठीमागून गोळ्या मारू नका. काहीही झालं तरी मी आमरण उपोषण सोडणार नाही, असंही जरांगे यांनी स्पष्ट केलं.