मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बीड येथील अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांचे गेल्या काही दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे.
एकीकडे राज्यात मराठा आरक्षणावरून आंदोलक आक्रमक झाले आहेत, यामुळे राज्यातील राजकारण देखील तापलं आहे. मराठा आंदोलनाच्या मागणीसाठी आंदोलकांनी आमदारांची घरे, गाड्या जाळल्या, रास्तारोको केले, राजकीय पक्षांची कार्यालय फोडली. रस्ते वाहतूक, महामार्ग रोखून धरले जात आहेत. काही भागात मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. त्यामुळे एसटी सेवा देखील बंद ठेवण्यात आली आहे.
तर दुसरीकडे आता मनोज जरांगे पाटील यांचे गेल्या काही दिवसांपासून आमरण उपोषण सुरू असल्याने त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत आहे. त्यामुळे धुळे येथे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने एकविरा देवी मंदिरात त्यांची प्रकृती स्थिर राहावी यासाठी प्रार्थना करण्यात आली.
यावेळी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषणाला बसलेल्या जरांगे पाटील यांना सर्व स्तरातून पाठिंबा मिळत आहे. आरक्षण मिळण्यासाठी त्यांची तब्येत स्थिर राहणं आवश्यक आहे. त्यासाठी धुळ्यात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने एकविरा देवी मंदिरात आरती करण्यात आली. त्यांना कोणत्याही प्रकारच्या उपोषणाचा त्रास होऊ नये व लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण मिळावे असे साकडे देवीला घालण्यात आले.