संपूर्ण राज्यभरात मराठा आरक्षणासाठी आंदोलने सुरू आहेत. नांदेडमध्ये देखील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी नागरिक रस्त्यावर उतरले होते. काही गावांमध्ये अजूनही साखळी उपोषण सुरू आहे. अशात आंदोलन काळात मुलगी झाल्याने एका व्यक्तीने आपल्या चिमुकलीचं नाव आरक्षणा ठेवलंय.
मराठा आरक्षणाची आठवण म्हणून एका मराठा आंदोलक तरुणाने आपल्या मुलीचं नाव आरक्षणा असं ठेवलंय. नांदेड जिल्हयातील अर्धापूर तालुक्यातील शेलगाव येथील आतम राजेगोरे या तरुणाचा विवाह दोन वर्षांपूर्वी गायत्री कंकाळ या तरुणीशी झाला. गेल्या आठवड्यात नांदेडमध्ये मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू होते. त्यात आतम राजेगोरे याचा सक्रिय सहभाग होता.
जरांगे पाटलांना पाठींबा म्हणून आतम राजेगोरे हा तरुण देखील गावात उपोषणावर बसला होता. गेल्या सोमवारी ३० ऑक्टोबर रोजी त्याचे उपोषण सुरू असताना पत्नी गायत्रीने मुलीला जन्म दिला. मराठा आरक्षण आंदोलन काळात मुलीचा जन्म झाल्याने या दांपत्याने आपल्या मुलीचे नाव आरक्षणा असे ठेवले आहे.
मराठा आरक्षणासाठी कधी नव्हे असे ऐतिहासिक आंदोलन झाले. यापूर्वी कधीही असे आंदोलन झाले नाही. त्यामुळें या मराठा आरक्षण आंदोलनाची आठवण म्हणून आपल्या मुलीचे नाव आरक्षणा ठेवल्याचे आतम राजगोरे यांनी सांगितले.
याआधी देखील अशा प्रकारे विविध घटनांवेळी मुलांचा जन्म झाल्याने त्यांचे नाव त्यानुसार ठेवण्यात आले आहे. कोरोना महामारी सारख्या भयंकर महामारीत जन्मलेल्या एका मुलीचं तिच्या कुटुंबियांनी कोरोना देवी असं नाव ठेवलं होतं. तर २६ /११ ला झालेल्या हल्ल्यावेळी जन्मलेल्या एका मुलीचं नाव गोली ठेवण्यात आलं होतं. या मजेशीर नावांमध्ये आता आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलन काळात चिमुकलीचा जन्म झाल्याने तिचं नावही आरक्षणा ठेवण्यात आलंय.