छत्रपती संभाजीनगर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा छत्रपती संभाजीनगर दौरा रद्द झाला आहे. हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने हा दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती समजते आहे. त्यामुळे अजित पवार आज पुण्यातच असणार आहेत.
गंगापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या 43 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते होणार होते. मात्र अजित पवारांचा आजचा हा दौरा रद्द करण्यात आला आहे. दरम्यान हेलिकॉप्टरमधील तांत्रिक बिघाडामुळे अजित पवार यांनी छत्रपती संभाजी नगरचा दौरा रद्द केला असल्याची माहिती समोर येत आहे.
आमदार सतीश चव्हाण यांच्या माध्यमातून आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विकास कामांचा उद्घाटनाचा आयोजन करण्यात आले होते. तसेच, 43 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते होणार होते. याचवेळी त्यांच्या याच दौऱ्याला मराठा आंदोलकांनी विरोध केला होता. त्यामुळे, मराठा समाजाच्या विरोधामुळे हा दौरा रद्द करण्यात आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
मराठा आंदोलकांनी केला होता विरोध
मराठवाडा साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमास अजित पवारांसह सर्वच राजकीय नेत्यांना मराठा आंदोलकांनी विरोध केला होता. याबाबत, गंगापूर तहसीलदार यांना मराठा आंदोलकांनी निवेदन देखील दिले होते. ज्यात,"शांततेत लोकशाही मार्गाने आम्ही राजकीय पुढाऱ्यांना विरोध करणार आहोत. तरी प्रशासनाने कायदा सुव्यवस्थेचा विचार करता राजकीय मंडळीना त्या ठिकाणी येण्यास प्रतिबंध करावा. अन्यथा होणाऱ्या परिणामास प्रशासन व प्रशासकीय अधिकारी जवाबदार असतील याची नोंद घ्यावी, असे निवेदनात म्हटले होते. दरम्यान, असे असतांना आता अजित पवारांनी आपला दौरा रद्द केला आहे.