कृत्रिम व फेक पनीर विक्री विरोधात कडक कारवाई करणार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा
कृत्रिम व फेक पनीर विक्री विरोधात कडक कारवाई करणार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा
img
दैनिक भ्रमर
मुंबई : फेक पनीर किंवा कृत्रिम पनीर हे निश्चितच नागरिकांच्या आरोग्यासाठी धोक्याचे आहे. हे पनीर विक्री करीत असलेल्या विक्रेते व संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल.


अनॉलॉग चीज च्या नावाखाली आर्टिफिशल पनीर किंवा फेक पनीर विक्रीबाबत संबंधित अधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच या विषयातील तज्ज्ञ व्यक्तींची बैठक घेण्यात येईल. या बैठकीत निर्णय घेऊन फेक पनीर विक्री बाबत कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिला.

ॲनालॉग चीज हा पदार्थ राज्यात ॲनालॉग पनीर, आर्टिफिशियल पनीर किंवा फेक पनीर या नावाने विक्री केल्या जात असल्याबाबत सदस्य विक्रम पाचपुते यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेत सदस्य कैलास पाटील यांनीही सहभाग घेतला.

उपमुख्यमंत्री पवार या सूचनेच्या उत्तरात माहिती देताना म्हणाले की, खाद्यपदार्थांतील भेसळ ओळखण्यासाठी त्यांचे नमुने घेण्यात येतात. या नमुन्यांची तपासणी करून त्याचे विश्लेषण करण्यात येते. प्रयोगशाळांमधील विश्लेषणामुळे भेसळ आढळलेल्या नमुन्यांवर कारवाई करीत भेसळयुक्त पदार्थ जनतेमध्ये जाण्यापासून रोखता येतात. त्यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या नवीन प्रयोगशाळा, प्रयोगशाळांचे बळकटीकरण यासाठी भरीव निधी देण्यात येईल.

फेक पनीरची विक्री, साठवणूक व वाहतुक विरोधात कारवाई करण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या नियमांमध्ये सुधारणा करून ते अधिक कठोर करण्यात येतील. तसेच केंद्र शासनाच्या नियमांमध्ये बदल करण्यास संबंधित केंद्रीय मंत्र्यांची चर्चा करण्यात येवून विनंती करण्यात येईल. कुठल्याही परिस्थितीत अशा पनीर विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा स्पष्ट इशाराही उपमुखमंत्री पवार यांनी दिला.
इतर बातम्या
Join Whatsapp Group