नाशिक रोड (भ्रमर प्रतिनिधी) : शहरातील वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे आणि सलग घडणाऱ्या खुनांमुळे नाशिक शहर पोलिस यंत्रणा टीकेच्या केंद्रस्थानी आली आहे. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी मोठा निर्णय घेत 12 वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या केल्या आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून शहरात विविध भागांमध्ये खुनाचे सत्र सुरूच असून, अंमली पदार्थांच्या (एम.डी. सारख्या) विक्रीतही वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकचे नाव राज्यभरात “खुनाचे शहर” म्हणून प्रसिद्ध होत असल्याची खंत नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.
या वाढत्या गुन्हेगारीबाबत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, आमदार राहुल ढिकले, आमदार देवयानी फरांदे आणि आमदार सीमा हिरे यांनीही पोलीस आयुक्तांची भेट घेऊन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली होती.
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आयुक्त संदीप कर्णिक यांनी अंतर्गत फेरबदलांचे आदेश जारी करून अधिकारी बदलले आहेत. नागरिकांच्या भाषेत सांगायचे झाले, तर “जळणारी भाकर फिरवण्याचा प्रयत्न” असा हा बदल म्हणून पाहिला जात आहे.
यात अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांची बदली गंगापूर पोलीस ठाण्यात, गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्रसिंग राजपूत यांची अंबड पोलीस ठाण्यात,अंबड पोलीस ठाण्याचे दुय्यम पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांची इंदिरानगर पोलीस ठाण्यात,भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे यांची सातपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
तर सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांची आडगाव पोलीस ठाण्यात,मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरोटे यांची एमआयडीसी उंचाळे पोलीस ठाण्यात,सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत नलवडे यांची विशेष शाखेत, आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय भिसे यांची सायबर पोलीस ठाण्यात,
एमआयडीसी चुंचाळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांची मुंबई नाका पोलीस ठाण्यात,इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांची शहर वाहतूक शाखा युनिट एक येथे,शहर वाहतूक शाखा युनिट एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तुषार आढवू यांची सातपूर पोलीस ठाण्यात,शहर वाहतूक शाखा सातपूर युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रियाज शेख यांची शहर वाहतूक शाखा द्वारका युनिट येथे बदली करण्यात आली आहे.
नवनियुक्त अधिकाऱ्यांनी तत्काळ पदभार स्वीकारावा, असे आदेश पोलीस आयुक्त कर्णिक यांनी दिले आहेत. या फेरबदलांमुळे वाढती गुन्हेगारी आटोक्यात येईल आणि कायदा-सुव्यवस्था पुन्हा पूर्ववत होईल का, हा प्रश्न मात्र अद्याप नागरिकांच्या मनात कायम आहे.