नाशिक : नाशिक शहरात गणेशोत्सवाचा मुख्य मिरवणूक २८ सप्टेंबर रोजी काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सतर्क झाले असून गुरुवारी शहरातून मुख्य विसर्जन मिरवणूक आणि नाशिकरोड येथूनही विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे. या दोन्ही मिरवणुकांमुळे वाहतूक मार्गात शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून बदल करण्यात आला आहे. याबाबतची सूचना नुकतीच उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी जारी केली आहे.
नाशिक शहरातील जुने नाशिक परिसरातील वाकडी बारव येथून सकाळी ११ वाजता गणेश विसर्जनाची मुख्य मिरवणूक सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर चौक मंडई ते थेट गौरी पटांगणापर्यंतच्या मिरवणूक मार्गावर केवळ मिरवणुकीत सहभागी गणेश मंडळांची वाहने आणि पोलीस दलाची वाहने मार्गस्थ होतील. या मार्गावर अन्य कोणत्याही वाहनांना प्रवेश राहणार नाही, असे आवाहन अधिसूचनेत वाहतूक शाखेने केले आहेत. दि. २८ रोजी सकाळी १० ते रात्री मिरवणूक संपेपर्यंत हा मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. यावेळी पंचवटी निमाणी बसस्थानकातून सुटणार्या बसेस सर्व पंचवटी आगारातून मार्गस्थ होतील, तसेच ओझर, दिंडोरी, पेठकडून शहरात येणारी वाहने, बसेस या आडगावनायावरून कन्नमवार पुलावरून पुढे द्वारका मार्गे नाशिकरोड व इतरत्र रवाना होतील, तसेच रविवार कारंजा, अशोकस्तंभ येथून सुटणार्या शहरांतर्गत वाहतुकीच्या सिटी लिंकच्या बसेस शालिमार येथून त्याच मार्गाने ये-जा करतील, अशा स्पष्ट सूचना वाहतूक शाखेकडून देण्यात आल्या आहेत.
या मार्गावरील वाहतूक बंद
दरम्यान, वाकडी बारव, चौकमंडई, जहांगिर मशीद, दादासाहेब फाळके रोड, महात्मा फुले मार्केट, विजयानंद थिएटर, गाडगे महाराज पुतळा, गो. ह. देशपांडे पथ, धुमाळ पॉइंट, सांगली बँक सिग्नल, महात्मा गांधी रोड, मेहर सिग्नल, अशोकस्तंभ, नवीन तांबट आळी, रविवार कारंजा, होळकर पूल, मालेगाव स्टॅण्ड, पंचवटी कारंजा, मालविय चौक, परशुरामपुरीयारोड, कपालेश्वर मंदिर, भाजीबाजार, म्हसोबा पटांगण या मार्गावरुन निघणार आहे. या मार्गावरील हातगाड्या, बैलगाड्या, सायकल, मोटरसायकल आदींची वाहतूक सकाळी दहा वाजेपासून ते रात्री मिरवणूक संपेपर्यंत बंद राहणार आहे. वरील सर्व निर्बंध रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची वाहने व मिरवणूक मार्गाच्या परिसरात राहणार्या रहिवाशांच्या वाहनांना लागू राहणार नाहीत, असे उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी म्हटले आहे.
असे आहेत पर्यायी मार्ग
वाहनधारकांसाठी इतर पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचा सूचना शहर पोलिसांकडून देण्यात आलेल्या आहेत. यात शहरातील मुख्य वाहतूक सेवा असलेली सिटी लिंक बस सकाळी १० ते मिरवणूक संपेपर्यंत पंचवटी एसटी डेपो क्रमांक २, सिटी लिंक डेपो तपोवन, निमाणी बस स्थानक, पंचवटी कारंजा येथून सुटणार्या बस पंचवटी डेपो येथून सुटतील. तसेच ओझर, दिंडोरी, पेठ येथून बस आणि इतर वाहने आडगाव नाका, कन्नमवार पूल, पुढे द्वारका सर्कलमार्गे नाशिकरोड व इतरत्र जातील. पंचवटीकडे येणारी सर्व वाहने देखील द्वारका सर्कल, कन्नमवार पुलावरून जातील. आरके येथून सुटणार्या बस शालिमार येथून सुटतील.
अशी असेल सुरक्षा
मिरवणूक मार्गावर एकूण ७० सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून ४ ड्रोन कॅमेर्यांद्वारे मिरवणूकीवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे.