८ मार्च २०२४
नाशिक (प्रतिनिधी) :- नाशिक शहरातील काही वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार करण्यात आल्या आहेत.
मुंबई नाका पोलीस ठाण्याची जबाबदारी छत्रपती संभाजीनगर येथून आलेले अशोक उत्तमराव गिरी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे, तर मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज पत्की यांची विशेष शाखेत बदली करण्यात आली आहे. पुणे येथून आलेले जयराम दशरथ पायगुडे यांना अमली पदार्थविरोधी, खंडणीविरोधी पथक व दरोडा पथक या ठिकाणची जबाबदारी देण्यात आली.
पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्याकडे शहर गुन्हे शाखा युनिट एकचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला असून, सारिका अवताडे यांच्याकडे पोलीस कल्याणचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.
सातपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांची उपनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध निरीक्षकपदी, पोलीस कल्याणचे पोलीस निरीक्षक इरफान शेख यांची आर्थिक गुन्हे शाखेत बदली झाली आहे. बडे साहब इलाही नाईकवाडे यांची नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक (गुन्हे) पदी, जगन्नाथ जानकर यांची सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक (गुन्हे) पदी, तर अंकुश चिंतामण यांची विशेष शाखेत नियुक्ती करण्यात आली आहे.
Copyright ©2024 Bhramar