नाशिक रोड पोलिसांनी केली तीन क्लिष्ट गुन्ह्यांची उकल; सराईतांसह आठ संशयित ताब्यात
नाशिक रोड पोलिसांनी केली तीन क्लिष्ट गुन्ह्यांची उकल; सराईतांसह आठ संशयित ताब्यात
img
Chandrakant Barve
नाशिक रोड (भ्रमर प्रतिनिधी) - भारती मठ, सुभाष रोड येथे दरोडा घालणारे सहा संशयित, गावठी कट्टा बाळगणारा सराईत गुन्हेगार व आपल्या मामाच्या घरात चोरी करणारा चोरटा अशा क्लिष्ट तिन्ही गुन्ह्यांची उकल नाशिक रोड पोलिसांनी केली आहे. या कारवाईत आठ संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, तीन मोठ्या गुन्ह्यांची उकल नाशिक रोड पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने केल्याची माहिती पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी दिली.

नाशिक रोड परिसरातील सुभाष रोड, भारती मठ येथे राहणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या घरावर हल्ला करणाऱ्या १२ संशयितांपैकी सहा संशयितांना काही तासांतच ताब्यात घेण्यात आले. उर्वरित संशयितांचा शोध सुरू आहे. सराईत गुन्हेगार अनेकत जॉन केरला उर्फ केरला अण्णा व आदित्य जारस यांच्यासोबतच्या जुन्या वादातून हा प्रकार घडला. धारदार शस्त्रांसह परिसरात दहशत निर्माण करून रोख रक्कम हिसकावणे, घराच्या दारावर व रिक्षांवर वार करून तोडफोड करण्यात आली होती.

या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान एकलहरे रोड, किर्लोस्कर कंपनी जवळच्या टेकडी जवळ संशयित लपल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा घालून धनंजय सुरेश मस्के, मयूर अनिल जानराव, तुषार रवींद्र सावंत, ऋषिकेश शिवाजी पवार,अभिनव नंदाजीत जाधव व एका अल्पवयीनाला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गुन्ह्यातील चार लोखंडी कोयते व चॉपर असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

जम्मू-काश्मीरमध्ये चकमक, एक जवान शहीद

गावठी कट्ट्यासह सराईत पकडला....
उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील फर्नांडिस वाडी गोळीबार प्रकरणातील मुख्य संशयित रोहित उर्फ माल्या गोविंद डिंगम हा गोरेवाडी परिसरात गावठी कट्टा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर नाशिक रोड पोलिसांनी सापळा रचला. रोहितने पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून देशी बनावटीचा गावठी कट्टा व एक काडतूस जप्त करण्यात आले.

मामाच्या घरीच भाच्याची चोरी...
नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीतील जाखुरी गावात एका घराचे कवले काढून घरात प्रवेश करीत कपाटातील २२ तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र व सहा हजार रोख अशी चोरी झाली होती. तपासादरम्यान हा संशयित कुटुंबातीलच असल्याचा अंदाज पोलिसांनी बांधला आणि तो खरा ठरला. या प्रकरणात फिर्यादीच्या बहिणीचा मुलगा महेश गोपाल अनवट (वय २१, रा. जाखुरी) याला ताब्यात घेतले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून २२ तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र पोलिसांनी जप्त केले.

उत्कृष्ट कामगिरीचे शिलेदार.... 
या तिन्ही गुन्ह्यांच्या उकल करण्यात पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक बडे साब नाईकवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशोध पथकाने कामगिरी केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, सुनील बिडकर, पोलीस हवालदार विजय टेमगर, विशाल पाटील, सागर आडणे, विशाल कुवर, नाना पानसरे, अजय देशमुख, समाधान वाजे, अरुण गाडेकर, नितीन भामरे, रोहित शिंदे, योगेश रानडे, निलेश वराडे, संतोष पिंगळे आदींनी या यशस्वीरित्या तीनही गुन्ह्यांची उकल केली.


इतर बातम्या
Join Whatsapp Group