नाशिक (प्रतिनिधी) :- डिलिव्हरीसाठी आलेले आयफोन व इतर कंपन्यांचे 51 मोबाईल डिलिव्हरी न करता परस्पर अपहार करणार्या फ्लिपकार्ट कंपनीचा डिलिव्हरी बॉय बळीराम रावजी खोकले याच्याविरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात दि. 8 जून रोजी इन्स्टाकार्ड कंपनीचे नाशिक शाखेचे मॅनेजर दिनेश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार गुन्हे शाखा युनिट-1 कडे वर्ग करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी त्यांना पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव व सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सीताराम कोल्हे यांनी मार्गदर्शन केले. तपास करताना पोलिसांच्या लक्षात आले, की गुन्ह्यातील आरोपी बळीराम खोकले या नावाचा इसम फ्लिपकार्ट कंपनीस कामास नव्हता. त्याच्या नावाचा उपयोग करून अज्ञात इसमाने वरील वर्णनाचे 51 मोबाईल चोरले होते.
याबाबत पोलिसांनी अधिक माहिती घेतली असता त्यांना असे समजले, की कॅशिफाय या ऑनलाईन जुने मोबाईल खरेदी-विक्री करणार्या कंपनीत निखिल पाथरवट व पूर्वी काम करणारा आकाश शर्मा यांनी फ्लिपकार्ट कंपनीशी संलग्नित असलेल्या नाशिक विभागातील इन्स्टाकार्ड कंपनीच्या एच. आर. विभागात काम करणारा निखिल मोरे याच्याशी संगनमत केले व त्यांच्या ओळखीचा असलेल्या अमोल खैरे नामक इसमास कंपनीत बळीराम खोकले नावाने कामास लावले. तेव्हापासून खैरे हा बळीराम खोकले नावाने मोबाईलचे पार्सल डिलिव्हरीकरिता बाहेर घेऊन जात होता. नंतर आकाश शर्मा व निखिल पाथरवट त्यातील मोबाईल काढून घेऊन मोबाईलच्या वजनाची फरशी टाकून ते पॅक करीत असत.
हे पार्सल डिलिव्हरी न झाल्याचे सांगून ते पुन्हा कंपनीत जमा करायचे. चोरलेले मोबाईल निखिल पाथरवट विक्री करायचा. नंतर या भामट्यांनी त्याच कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणारा शुभम् नागरे यालादेखील आपल्या कटात सहभागी करून घेतले. तोपण डिलिव्हरीसाठी आलेले मोबाईल काढून निखिल पाथरवटला विक्रीसाठी देत होता. या सर्व अपहारात एच. आर. विभागातील निखिल मोरे हादेखील मदत करीत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.
पोलिसांनी या डिलिव्हरी बॉयचे मोबाईलचोरीचे रॅकेट उघडकीस आणून या प्रकरणातील आकाश गोविंद शर्मा (वय 24, रा. भोसरी, पुणे), शुभम् विनायक नागरे (वय 27, रा. पिंपळगाव बहुला, सातपूर), निखिल मंगलदास पाथरवट (वय 32, रा. पाथर्डी रोड, नाशिक), निखिल सतीश मोरे (वय 30, रा. तिडकेनगर, नाशिक), अमोल शिवनाथ खैरे (वय 23, रा. म्हाडा कॉलनी, चेहेडी शिवार) यांना अटक केली असून, त्यांच्याकडून 3 लाख 6 हजार 582 रुपये किमतीचे दहा मोबाईल जप्त केले आहेत. या गुन्ह्यातील आकाश शर्मा हा पुण्यातील सराईत गुन्हेगार असून, तो तडीपार आहे.