नाशिक (प्रतिनिधी) :- अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे; मात्र त्यांचे अंबड पोलीस ठाण्यातील कामकाज चांगले असल्यामुळे त्यांची बदली रद्द करावी, अशी मागणी सर्व राजकीय पक्षांच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात आज अंबड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त शरद देशमुख यांच्या उपस्थितीत अंबड पोलीस ठाण्यात सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली. यावेळी देशमुख यांना वाघ यांची बदली रद्द करण्याचे साकडे घालण्यात आले.
याबाबत आरपीआयचे शहराध्यक्ष ॲड. प्रशांत जाधव यांनी सांगितले, की वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ हे प्रामाणिक व कर्तव्यदक्ष अधिकारी असून, गेल्या दोन-तीन महिन्यांत अंबड पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगारी नियंत्रणात आली आहे. यापूर्वी झालेल्या गुन्ह्यातील गुन्हेगारांनादेखील त्यांनी अटक केली आहे, तसेच प्रमोद वाघ हे तक्रारी घेऊन आलेल्या सामान्य जनतेशी आणि पोलीस ठाण्यातील सहकारी कर्मचाऱ्यांशीदेखील सौजन्याने वागतात, तक्रारी घेऊन आलेल्या नागरिकांना समजून घेऊन त्यांचे प्रश्न सोडवितात व काही केसेसमध्ये दोन्ही बाजूंचा समन्वय साधून जागीच तक्रारींचे निवारण करतात. त्यामुळे पोलीस कर्मचारी आणि सामान्य जनतेतही प्रमोद वाघ यांच्याविषयी चांगली भावना आहे.
याचबरोबर ॲड. प्रशांत जाधव यांनी सांगितले, की सुमारे गेल्या दोन वर्षांत अंबड पोलीस ठाण्यात पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली झाली आहे. वरिष्ठ अधिकारी, पोलीस ठाण्याची हद्द आणि इतर बाबी समजून घेऊन कामाविषयी पकड घेत नाही तोच त्यांची बदली होते. त्यामुळे गुन्हेगारांचे फावते. सध्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांची कामकाजावर आणि गुन्हेगारांवर पकड बसलेली असल्यामुळे त्यांची बदली करू नये, असेही साकडे सहाय्यक पोलीस आयुक्त शरद देशमुख यांना घालण्यात आले.
या सर्वपक्षीय बैठकीत रिपाइंचे शहराध्यक्ष ॲड. प्रशांत जाधव यांच्यासह संजय भामरे, डी. जी. सूर्यवंशी, मामा ठाकरे, लक्ष्मण जायभावे, राकेश ढोमसे, जगन पाटील, समाधान ढोके, देवेंद्र पाटील, संदीप पवार, विजय पाटील, आशिष हिरे, दीपक मोकळ आदी सर्वपक्षीय नेते व पदाधिकाऱ्यांसह सुमारे शंभर कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, पोलीस आयुक्तांनी केलेल्या या बदलीमुळे त्यांच्याविषयी नागरिकांमध्ये नाराजीचा सूर पसरला आहे. वाघ यांच्यासाठी सिडको व नवीन नाशिकमधील रहिवासी एकवटले असून, वाघ यांची बदली तत्काळ रद्द करावी, अशी आग्रही मागणी यावेळी सर्वांनी केली.