नवीन नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- तोतया पोलिसांनी एका वृद्धाला त्याच्या गळ्यातील चेन व अंगठी काढून रुमालात ठेवण्यास सांगून हातचलाखीने चार तोळ्यांचे दागिने घेऊन फसवणूक केल्याची घटना सिडकोत घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की काल (दि. 20) सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास अभियंतानगर येथील कृष्णलीला अपार्टमेंटमधील शॉप नंबर 5 येथे मोटारसायकलीवर दोन अनोळखी इसम आले. “आम्ही पोलीस आहोत. या ठिकाणी रमेश पाटील यांच्या घरी चोरी झाली आहे. ते कुठे राहतात?” असे बोलून तेथून जाणार्या त्यांच्या ओळखीच्या एका इसमास त्याच्या गळ्यातील साखळी व अंगठी काढून ठेवण्यास सांगितले व फिर्यादी सोमनाथ काशीनाथ खैरनार (वय 71, रा. खुशाली हाईट्स, वृंदावननगर, अंबड, नाशिक) यांना त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी व बोटातील सोन्याची अंगठी काढून खिशात ठेवण्यास सांगितले.
त्यानंतर फिर्यादीच्या दुसर्या खिशातून रुमाल काढून सोने ठेवलेल्या खिशात रुमाल ठेवून हातचलाखीने फसवणूक करून फिर्यादी यांच्या खिशातून 90 हजार रुपये किमतीची 32 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन व 25 हजार रुपये किमतीची दहा ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी असा सुमारे 1 लाख 15 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल घेऊन फिर्यादीची फसवणूक करून निघून गेले. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार शेख करीत आहेत.