राज्यातील राजकरणात घडामोडींना वेग आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीतील जागा वाटपावरून महायुतीत तिढा निर्माण झाला होता. महायुतीतील कोणत्या पक्षाला जास्त जागा मिळतील यावरून ही रस्सीखेच निर्माण झाली होती. दरम्यान आता याच संदर्भात आता एक मोठी अपडेट समोर आली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीतील जागा वाटपावरून महायुतीत रस्सीखेच सुरू होती. जिथे भाजपचे संख्याबळ अधिक आहे, त्या जागांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीने दावा सांगितला. त्यामुळे पेच वाढला आहे. तीनही पक्षातील वरिष्ठांची बैठक झाली होती. त्यात चर्चा ही झाली होती. पण गुंता सुटत नव्हता. पण महायुती म्हणून लढले नाही तर नुकसान होण्याची शक्यता होती. अंतर्गत गटबाजी टाळण्यासाठी प्राथमिक चर्चा झाली. त्यात जागा वाटपाच्या फॉर्म्युलावर एकमत झाले.
विधान परिषद निवडणुकीत संभाव्य घोडेबाजार टाळण्यासाठी आणि मिठाई बॉक्सची संस्कृती टाळण्यासाठी मोठे पाऊल टाकले. स्थानिक स्वराज्य संस्थांची विधान परिषद निवडणूक महायुती म्हणूनच लढण्यावर एकमत झाले. भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठांचे एकमत झाले आहे. महायुतीच्या एका वरिष्ठ नेत्याने याविषयीची खात्रीलायक माहिती दिली आहे. त्यामुळे आता महायुतीतील घटक पक्ष 17 जागांवर महायुती म्हणून लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
तर एक मोठी अपडेटही समोर येत आहे. त्यानुसार, काही ठिकाणी पारंपरिक जागांची अदलाबदल केली जाणार आहे. तूर्त भाजप १२, शिवसेना ३ व राष्ट्रवादी काँग्रेस २ या फॉर्म्युलावर प्राथमिक चर्चा झाल्याचे म्हटले जात आहे. तर याच आठवड्यात जागा वाटप पूर्ण केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पण पारंपारिक जागांची अदलाबदल झाल्यास नाराजांना कसे रोखणार असा सवाल समोर येत आहे. कारण काही जागांवर त्या त्या पक्षातील स्थानिक नेते लढण्यास इच्छुक आहेत. त्यांची मनधरणी करण्याचे मोठे आव्हान तीनही पक्षांवर आहे. तर याच आठवड्यात जागा वाटप होणार असल्याने कुणाच्या गळ्यात उमेदवारी पडणार हे पण समोर येणार आहे.