इराण अमेरिका संघर्षामुळे भारताला मोठा फटका सहन करावा लागत आहे. देशात मोठ्या प्रमाणात महागाई वाढलीय असून सोने चांदी , तेल
आणि इंधनाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. आता तर जवळ जवळ १० दिवसात चौथ्यांदा इंधनाचे दर वाढले आहेत. त्यातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे ज्यामुळे नागरिकांच्या चिंतेत भर पडणार आहे. आता इंधनाचा पुरवठा कमी झाल्याने अनेक ठिकाणी पेट्रोल आणि डिझेल मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत.
दरम्यान, इंधन टंचाईची झळ आता थेट मुंबईपर्यंत पोहोचली आहे. राजधानी मुंबईतील काही पेट्रोल पंपांवर इंधन संपल्याने ते तात्पुरते बंद ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सायन परिसरातील अनेक पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेल उपलब्ध नसल्याचं सांगितलं जात आहे. काही ठिकाणी फक्त सीएनजी सेवा सुरू असून त्यासाठीही वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत.
परळ परिसरातील काही पेट्रोल पंपांवरही इंधन संपल्याचं चित्र दिसत आहे. सायनमधील पेट्रोल पंपांवर सकाळपासून पेट्रोल, डिझेल आणि पॉवर पेट्रोल उपलब्ध नसल्याने वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. इंधन पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे पंपावरील कर्मचारीही रिकामे बसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, वाढत्या इंधन संकटामुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात असून सरकारकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे.