मनोज जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य! सरकारमधील बड्या मंत्र्याची माहिती
मनोज जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य! सरकारमधील बड्या मंत्र्याची माहिती
img
Dipali Ghadwaje
मराठा आरक्षणासंदर्भात नवी मुंबईतून एक मोठी बातमी समोर आली आहे. मनोज जरांगे पाटील आणि राज्य सरकारच्या शिष्टमंडळामध्ये सकारात्मक चर्चा झाली असून त्यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी माध्यमांना दिली आहे. आता ते महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेतील, असंही केसरकर यांनी माध्यमांना सांगितलं आहे.  त्यामुळे मनोज जरांगे पाटील आता नेमका काय निर्णय घेणार याकडेच संपूर्ण मराठा समाजाचं लक्ष लागून आहे.

थोड्याच वेळात मनोज जरांगे पाटील वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून आंदोलनाविषयी आपली भूमिका जाहीर करणार आहे.  सरकारच्या शिष्टमंडळासोबत आपली नेमकी काय चर्चा झाली. नवीन जीआरमध्ये नेमकं काय आहे? याबाबतची माहिती मनोज जरांगे जाहीर सभेतून मराठा बांधवाना वाचून दाखवणार आहे. यापूर्वी देखील सरकारने अनेक जीआर सरकारने मनोज जरांगेंना पाठवले होते. मात्र, प्रत्येक वेळी जरांगे यांनी जीआरमध्ये त्रुटी आहे, असं सांगत त्या सुधारण्याची सरकारला विनंती केली होती.

त्यामुळे आरक्षणाचा प्रश्न चिघळत चालला होता. आता मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्याचं मंत्री दीपक केसरकर यांनी माध्यमांना सांगितलं आहे. मागण्या मान्य झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी ही शासकीय विहित नियमानुसार होत असते, परंतु महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा असं घडलं, की आतापर्यंत आपण ३७ लाख कुणबी प्रमाणपत्र देऊ शकलो आणि आता यापुढे ही संख्या ५० लाखांच्या वर जाणार असल्याचं केसरकर यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, गुरुवारी (२५ जानेवारी) लोणावळ्यात देखील सरकारचे शिष्टमंडळ जरांगे यांची भेट घेण्यासाठी पोहचले होते. मात्र, त्यावेळी जरांगे यांनी आंदोलनावर ठाम राहण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, आता राज्य सरकार आणि सरकारच्या शिष्टमंडळात सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील जरांगे यांच्यासोबत फोनवरून चर्चा केल्याची माहिती आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील आता नेमका काय निर्णय घेणार? याकडे संपूर्ण मराठा समाजाचं लक्ष लागून आहे.

 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group