राज्यात गेल्या काही महिन्यांपासून डेंग्यूच्या प्रभाव वाढताना दिसत आहे. गेल्या नऊ महिन्यांत डेंग्यूमुळे राज्यभरात 31 जणांचा मृत्यू झाला असून, एकूण 13,594 रुग्ण प्रभावित झाले आहेत. मुंबईत या आजाराच्या सर्वाधिक घटना नोंदवल्या गेल्या आहेत. ज्यात डेंग्यूची 3,435 प्रकरणे आढळून आली असून 12 मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, मुंबईत डेंग्यूपासून बचाव करण्यासाठी रहिवाशांचे प्रबोधन करण्यासाठी 'भाग मच्छर भाग' जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे. डासांची उत्पत्ती ठिकाणे वेळेवर नष्ट केल्याने डेंग्यू आणि इतर संबंधित आजारांवर नियंत्रण मिळू शकते यावर या उपक्रमात भर देण्यात आला आहे. डेंग्यूच्या सामान्य लक्षणांमध्ये अंगदुखी, थंडी वाजून येणे, ताप, खोकला आणि सर्दी यांचा समावेश होतो. रहिवाशांना पाणी साचू नये म्हणून टायर, नारळाची टरफले, प्लास्टिकच्या बाटल्या आणि कंटेनर यासारख्या वस्तूंची तपासणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तज्ञांनी फेंगशुई आणि मनी प्लांट्स सारख्या शोभेच्या वनस्पतींमध्ये नियमितपणे पाणी बदलण्याचंही आवाहन केलं आहे. याव्यतिरिक्त, दिवसा किंवा रात्री झोपताना मच्छरदाणी वापरण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. तसेच जुने टायर आणि पाण्याच्या टाक्या यांसारख्या वस्तूंचा संग्रह टाळण्याचा सल्लाही तज्ञांकडून दिला जात आहे.
तसेच, डेंग्यूपासून बचाव करण्यासाठी घराभोवती स्वच्छता असणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच परिसरात पाणी साचणार नाही याची काळजी घेणेही महत्त्वाचे आहे. साधारणत: डेंग्यूचे डास साचलेल्या पाण्यात आपली अंडी घालतात. त्यामुळे डासांच्या उत्पत्तीचा धोका कमी करण्यासाठी कोणत्याही साचलेल्या पाण्याचा त्वरित निचरा करणे आवश्यक आहे.