मी तोंड उघडले, तर बाहेर फिरणे अवघड होईल ; अजित पवारांचा इशारा
मी तोंड उघडले, तर बाहेर फिरणे अवघड होईल ; अजित पवारांचा इशारा
img
दैनिक भ्रमर
"बारामतीच्या विद्यमान खासदारांनी विकासकामांसदर्भात जे परिपत्रक काढले आहे, त्यातील ९० टक्के कामे मी स्वतः केली आहेत. या आधी बारामतीमध्ये फक्त शेवटची सभा व्हायची. आता त्यांना (शरद पवार) का फिरावे लागत आहे? मी सध्या खूप तोलून मापून बोलत आहे. पण, जर का तोंड उघडले, तर यांना बाहेर फिरणे अवघड होईल", असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना दिला.

मंगळवार, दि. ९ एप्रिल रोजी बारामती तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. अजित पवार म्हणाले, याआधी फॉर्म भरल्यानंतर फक्त शेवटची सभा बारामतीत व्हायची, आता का फिरावे लागत आहे? जे तुम्ही सांगितले, तेच मी आजपर्यंत केले. आताच्या खासदारांनी पत्रक काढले, पण त्यातील ९० टक्के कामे मीच केलेली आहेत. पोलीस उपमुख्यालाय, नगरपालिका, पोलीस ठाणे, पंचायत समिती, रस्ते ही कामे मीच केली.

मी कऱ्हा नदीवरचे सगळे बंधारे नवीन करायला सांगितले आहेत. नाझरे धरणात पाणी आणण्याची योजना माझ्या डोक्यात आहे. केंद्राचा निधी आपल्याकडे येत नव्हता. आपला उमेदवार निवडून आला तर माझी ही कामे करा असे मी मोदींना सांगेन. हा विकासाचा रथ पुढे घेऊन जायचे असेल, तर भावनिक होऊ नका. घड्याळाशिवाय पर्याय नाही, असे आवाहन अजित पवार यांनी केले.


मोदी महाराष्ट्रासाठी विक्रमी निर्णय घेतील

राजकारणामध्ये कुणी कुणाचा कायमचा शत्रू आणि कायमचा मित्र नसतो. मोदींनी सांगितले की परत जेव्हा ते पंतप्रधान होतील,त्यावेळी पहिल्या दोन महिन्यांत असे निर्णय घेतील की सगळे आश्चर्यचकित होतील. गेल्या १० वर्षांत केंद्रातील आपले एकही काम झाले नाही. मी २ तारखेला सरकारमध्ये गेलो आणि अमित शहा यांना सांगितले की हे काम करून द्या. तात्काळ १० हजार कोटींचा इन्कम टॅक्स केंद्र सरकारने माफ केला, असेही अजित पवार यांनी सांगितले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group