मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. जोगेश्वरी येथील भूखंड आणि आलिशान हॉटेलच्या बांधकाम प्रकरणी अखेर रवींद्र वायकर, त्यांची पत्नी तसेच इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आर्थिक गुन्हे शाखेने हा गुन्हा दाखल केला असून याप्रकरणाचा सखोल तपास देखील केला जाणार आहे. आमदार रवींद्र वायकर यांनी जोगेश्वरी येथील सुप्रीमो क्लबचा गैरवापर तसेच तिथे हॉटेल बांधताना माहिती लपवल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. इतकंच नाही, तर रवींद्र वायकर यांच्या हॉटेलचे बांधकाम बेकायदेशीर असल्याचा आरोपही किरीट सोमय्या यांनी केला होता.
किरीट सोमय्या यांच्या तक्रारीची दखल घेत मुंबई महानगरपालिकेने रवींद्र वायकर यांच्या हॉटेलमधील नव्याने होत असलेल्या बांधकामाची परवानगी नाकारत स्थगिती दिली. या स्थिगितीविरोधात रवींद्र वायकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
दरम्यान, उच्च न्यायालयाने वायकर यांची स्थगिती उठवण्याची याचिका फेटाळून लावली. आता आर्थिक गुन्हे शाखेने आमदार रवींद्र यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आझाद मैदान पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला असून लवकरच या प्रकरणाचा सखोल तपास केला जाणार आहे.