बारामती लोकसभा मतदारसंघातून मोठी बातमी; सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवारांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून नोटीस
बारामती लोकसभा मतदारसंघातून मोठी बातमी; सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवारांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून नोटीस
img
Dipali Ghadwaje
बारामती लोकसभा मतदारसंघातून एक मोठी अपडेट समोर आली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील वातावरण तापत असतानाच दुसरीकडे, उमेदवारांच्या निवडणूक प्रचार यंत्रणेच्या खर्चाचा ताळमेळ लागत नसल्याचे समोर आले आहे. याच पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांना निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी नोटीस बजावली आहे. उमेदवारांनी दाखविलेल्या खर्चात आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडील शॅडो रजिस्ट्रर खर्चात तफावत आढळून आल्यामुळे ही नोटीस बजावण्यात आली आहे.
 
 दोन्ही उमेदवारांनी ४८ तासांच्या आत निवडणूक खर्चाचा खुलासा करावा, अशी सूचना देखील या नोटीसीत करण्यात आली आहे. उमेदवारांनी नोटीसीला उत्तर न दिल्यास खर्चातील तफावत दोन्ही उमेदवारांना मान्य आहे असं समजलं जाणार, असंही या नोटीसीत मांडण्यात आलं आहे.

नोटीसीवर आक्षेप असल्यास उमेदवारांना जिल्हा निवडणूक निरीक्षण समितीकडे दाद मागण्याचा अधिकार आहे, असंही नोटीसीत म्हटलं आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे विरुद्ध महायुतीच्या सुनेत्रा पवार यांच्यात लढत होत आहे.

दोन्ही उमेदवारांकडून सध्या जोरदार प्रचार सुरू असून मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या जात आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या खर्चाची दुसरी तपासणी बुधवारी झाली. त्यात सर्व ३८ उमेदवारांनी सादर केलेल्या खर्चाचा आढावा घेण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांचा २८ एप्रिलपर्यंत एकूण खर्च ३७ लाख २३ हजार ६१० इतका झाला आहे. खर्च प्रतिनिधीने सादर केलेल्या खर्चाशी निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्यांकडील रजिस्टरशी तुलना केल्यावर त्यात १ लाख ३ हजार ४४९ रुपयांची तफावत आढळून आली आहे.

ही तफावत उमेदवाराच्या प्रतिनिधीने अमान्य केली आहे. याबाबतचा खुलासा पुढील ४८ तासांत देण्याचे सांगण्यात आले आहे. दुसऱ्या तपासणीत आढळलेल्या खर्चाच्या तफावतीवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनीही नोटीस बजावण्यात आली आहे. ⁠

सुनेत्रा पवार यांचा २८ एप्रिलपर्यंतचा खर्च २९ लाख ९३ हजार ३१ रुपये इतका आहे. उमेदवाराच्या खर्च प्रतिनिधीने सादर केलेल्या खर्चाशी निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडील रजिस्टरशी तुलना केल्यावर त्यात ९ लाख १० हजार ९०१ रुपयांची तफावत आढळली. यामुळे सुनेत्रा पवार यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group