मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातोय. कारण आगामी काळात विधानसभेची निवडणूक असणार आहे. त्याआधीच सीबीआयकडून अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करुन आरोपी बनवण्यात आलं आहे. त्यामुळे अनिल देशमुख हे पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत.
अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या कथित वसुलीचा आरोप असून ते याच प्रकरणात जामीनावर बाहेर आहेत. आता देखमुख यांच्यावर पुन्हा गुन्हा दाखल झाल्याने त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयने आणखी एक गुन्हा दाखल केला आहे. अनिल देशमुख यांनी 'एक्स' मीडियावर पोस्ट करत याबााबत माहिती दिली. त्यानंतर या पोस्टमधून अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीसांना आव्हान दिलं आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर अजिबात घाबरणार नसल्याचे म्हणत अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. यावेळी धन्यवाद, देवेंद्र फडणवीस म्हणत देशमुखांनी त्यांच्यावर उपरोधिक टोला लागवला आहे.
अनिल देशमुख काय म्हणाले?
अनिल देशमुख पोस्ट करत म्हणाले, 'आज माझ्यावर सीबीआयकडून आणखी एक तथ्यहीन गुन्हा दाखल केला गेलाय. जनतेचा कौल बघून देवेंद्र फडणवीसांच्या पायाखालची वाळू घसरल्याने हे कटकारस्थान सुरू झालं आहे. या अशा धमक्यांना आणि दबावाला मी अजिबात भीक घालत नाही. न झुकता- न डगमगता मी भाजपच्या या दडपशाही विरुद्ध लढण्याची खूनगाठ बांधली आहे'.
'महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांकडून किती खालच्या पातळीचे आणि विकृत मानसिकतेचे घाणेरडे राजकारण सुरू आहे ते जनतेने बघावे. लोकसभा निवडणुकीत या कारस्थानी नेतृत्वाला जनतेने जागा दाखवून दिली आहे, आता महाराष्ट्राची जनता विधानसभा निवडणुकीची वाट बघत आहे, असे देशमुख म्हणाले.