विधानसभा निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. मात्र निवडणुकीच्या तोंडावर धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस इर्शाद जागीरदार यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.
इर्शाद जागीरदार यांनी समाजवादी पार्टीत जाण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रवेशासंदर्भात इर्शाद जागीरदार यांनी काही दिवसांपूर्वी लखनऊ येथे जाऊन खासदारअखिलेश यादव यांची भेट घेतली होता.
मिळालेल्या माहितीनुसार येणाऱ्या 9 सप्टेंबरला आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह ते समाजवादी पक्षात प्रवेश करणार आहेत. धुळे शहर विधानसभेसाठी ते इच्छुक असल्याने अखिलेश यादान यांनी इंडिया आघाडीतर्फे त्यांची उमेदवारी जाहीर केली असल्याचा त्यांनी दावा केला आहे. तसेच यांना पक्ष सोडण्यासाठी इतरही कारणे दिले आहेत.
यामध्ये बदलापूर येथील घडलेली घटना आणि मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी केलेले वादग्रस्त विधान, काही दिवसांपूर्वी मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळून झालेल्या घटनेतील आरोपींना अद्यापही राज्य सरकारकडून अटक केली गेली नाही, या संपूर्ण घडामोडींमुळे नाराज होऊन आपण अजित पवार यांची साथ सोडून समाजवादी पक्षात जात असल्याचे देखील इर्शाद जागीरदार यांनी सांगितले.