राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी विघ्नहत्या गणरायाला अजब साकडे घातले आहे. महायुतीच्या सर्व नेत्यांना बुद्धी दे, अशी विनवणीच छगन भुजबळ यांनी गणपतीकडे केली आहे. छगन भुजबळ हे मुंबईतील अंजिरवाडीतील गणेशोत्सवात सामील झाले होते. बाप्पाच्या दर्शनानंतर मीडियाशी संवाद साधताना भुजबळांनी हे विधान केलं.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून महायुतीतील आमदारांकडून बेताल विधानं केली जात आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी हे विधान केलं आहे. महायुतीच्या सर्व नेत्यांना बुद्धी द्या हीच परमेश्वराकडे प्रार्थना आहे. कुठल्याही प्रकारचा वाद निर्माण होईल असं वक्तव्य नेत्यांनी करू नये. आपल्यात भेदभाव आहे, असं चित्र जनतेसमोर आणू नका. येवढंच सांगेन, असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर प्रतिक्रियाही व्यक्त केली.
आमच्या महायुतीतील नेत्यांना, कार्यकर्त्यांना बुद्धी यावी, जेणे करून ते चुकीचे वक्तव्य करणार नाहीत, अशी प्रार्थना करेल. आपण सगळे एक आहोत, आणि एक होऊन विधानसभेला सामोरे जाणार आहोत, असंही त्यांनी सांगितलं.