विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राजकारणात मोठमोठ्या घडामोडी होत आहेत, आगामी निवडणुकीच्या आधी मनोज जरांगे यांनीही मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर लढण्यासाठी चांगलीच तयारी केली आहे . ते वेळोवेली विविध बैठका, दौरे आणि उपोषण करत आहेत. दरम्यान , मनोज जरांगे यांच्या आता राज्यात घोंगडी बैठका सुरू आहे. आज बीडमध्ये जरांगे यांनी घोंगडी बैठक घेतली, यावेळी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. तसंच, ‘बीडमध्ये पालकमंत्री तुमचाच होणार आहे. तोपर्यंत मी गप्प बसत नाही. येत्या काही दिवसांमध्ये भाजपमध्ये मोठा स्फोट होईल, सगळे इकडे दिसतील,’ असा दावा मनोज जरांगे यांनी केला आहे.
पुढे ते म्हणाले, हा संघर्ष कधीच थांबणार नाही. मला बदनाम करण्यासाठी टोळ्या उभ्या केल्या. आंदोलन करणाऱ्यांच्या टोळ्या, आमदार, मंत्र्याच्या टोळ्या माझ्या विरोधात उभ्या केल्या. हे सगळं फडणवीस यांनीच केलं आहे. सत्तेची मस्ती सोडून देऊन आरक्षण द्यावं,’ असं म्हणत मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा फडणवीस यांच्यावर आरोप केला.
‘अंतरवली सराटीमधला हल्ला हा देवेंद्र फडणवीस यांनी घडवून आणला. माझ्या आया-बहिणीच्या अंगावर हल्ले चढवले. मग का शिव्या देऊ नये. मराठ्यांचा संयम सुटला तर हे आमदार चटणीला पुरणार नाही. आम्ही शांततेत आणि धीरानं घेतोय. मराठा रस्त्यावर आला तर पाय ठेवायला जागा राहणार नाही. मी फुटणार नाही आणि गद्दारी करू शकत नाही. मला काही मिळवायचं नाही फक्त समाजाच्या चेहऱ्यावर आनंदात बघायचं आहे,’ असंही जरांगे म्हणाले.
‘फडणवीस तुम्हाला मराठा समाजाने काय कमी केलं? सत्तेचा वापर मराठ्यांच्या विरोधात करता. आमदार आमच्या विरोधात तुम्ही घातले. बीडने बरोबर पाडापाडी केली. जनता आधी नंतर पक्ष. जातीच्या पाठीशी उभे राहिलो त्यामुळे तुम्हा सगळ्यांना मानाचा जय महाराष्ट्र करतोय. नको आम्हाला पक्ष आणि नको आम्हाला नेता, आम्हाला आमच्या लेकराचा विचार करायचा आहे. गोरगरीब मराठे जागे व्हा, बीडमध्ये पालकमंत्री तुमचाच होणार आहे. तोपर्यंत मी गप्प बसत नाही. येत्या काही दिवसांमध्ये भाजपमध्ये मोठा स्फोट होईल, सगळे इकडे दिसतील,’ असा दावा मनोज जरांगे यांनी केला आहे.