आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण चांगलेच तापले आहे . दरम्यान विधानसभेच्या आधीच अजित पवार यांनी मोठे संकेत दिले आहेत .
आता बारामतीकरांना मी नाही तर दुसरा आमदार मिळाला पाहिजे, असे अजित पवार यांनी म्हटले. यामुळे अजित पवार आता बारामती विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार नाही, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत. ते बारामती मध्ये बोलत होते .
आपण लाखोंच्या मतांनी निवडून येणारी माणसे आहोत. मी आता ६५ वर्षांचा झालो आहे. मी समाधानी आहे. अजित पवार यांच्या या वक्तव्यानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरु केली. ‘एकच दादा अजित दादांचा’ घोषणा दिल्या. अजित पवार त्यांना थांबवत पुन्हा म्हणाले, जेथे पिकते तेथे विकत नाही. एकदा बारामतीकरांना मी सोडून इतर आमदार मिळाला पाहिजे. मग तुम्ही त्याच्या कारकिर्दीतील आणि माझ्या कारकिर्दीची तुलना करा.असेही ते यावेळी म्हणाले.
तसेच ते पुढे म्हणाले, बारामतीकरांना न सांगता सर्व मिळत गेले. न सांगता रस्ते होत गेले. न सांगता पिण्याच्या पाण्याची योजना आली. मेडीकल कॉलेज न मागता मिळले. आयुर्वेदीक कॉलेज मिळाले. सध्या बारामती शहर सोडून इतर मतदार संघात ७५०कोटींची कामे चालू आहेत.