कोलकाता मधील डॉक्टरवर झालेला अत्याचार आणि हत्या आणि त्यापाठोपाठ बदलापूरमधील दोन चिमुकल्यांवर अत्याचाराच्या घटनेनं संपूर्ण देश हादरलेला असताना राज्यातील विविध भागांमधून महिला अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. दरम्यान जळगावच्या चोपडा तालुक्यात अशीच एक संतापजनक घटना समोर येत आहे.
जळगावच्या चोपडा तालुक्यात शनिवारी रस्त्यावर एका बारा वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. तिच्या लहान बहिणीने हा प्रकार गावकऱ्यांना सांगितल्यानंतर ही घटना उघडकीस आली. घटनेच्या निषेधार्थ चोपडा तालुक्यात मूक मोर्चा काढण्यात आला. आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. दरम्यान, पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
याविषयी ,अधिक माहिती अशी की , शेतातील निंदणीचे काम आटोपून पीडिता रस्त्याने आपल्या गावाकडे निघाली होती. पीडितेसोबत तिची लहान बहीणही होती. या दरम्यान शनिवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास बारा वर्षीय मुलीला आरोपीने एका शेतात ओढून तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर घटना उघडकीस येऊ नये म्हणून त्याने तिला दगडाने ठेचून मारुन टाकले. ही घटना 7 सप्टेंबरला सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास घडली.
हत्येनंतर आरोपीने अल्पवयीन मुलीला विवस्त्र घटनास्थळावरून १०० फूट ओढत नेत कापसाच्या शेतात फेकून दिल्याचे समोर आले. संबंधित घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पीडितेच्या बहिणीने गावकऱ्यांना याबाबत माहिती दिली. यानंतर गावकऱ्यांनी शोधाशोध केली तेव्हा पीडितेचा मृतदेह सापडला. यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखत तातडीने घटनास्थळाला भेट दिली.
तसेच, पोलिसांनी तातडीने या प्रकरणाचा तपास करण्यासाठी चार पथके तयार केले. ही पथकं तातडीने कामा लागली. या दरम्यान चोपडा-आडगाव रस्त्यावर आरोपी पळून जात असताना पोलिसांच्या हाती लागला. त्याच्यावर पोक्सो कायद्यासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक साळवे यांनी दिली आहे. या घटनेनंतर नागरिकांनी आज मोठ्या प्रमाणात आक्रमक होत मूक मोर्चा काढला.