अमरावती : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा करतांना त्यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील महायुती सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली. आतापर्यंत या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात दोन हप्त्यांचे पैसे प्रत्येकी ३००० रुपये जमा झाले आहेत. आता तिसऱ्या हप्त्याचे १५०० रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेमुळे सरकारी तिजोरीत ठणठणाट होत असून महाराष्ट्र कर्जबाजारी होईल, अशी टीका विरोधक करीत आहेत. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील योजनेसंदर्भात मोठं भाकित केलं आहे.
लाडकी बहिण योजनेचा ऑक्टोंबरचा हप्ता दिल्यानंतर शासनाकडे सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार द्यायलाही पैसे राहणार नाही आणि तिजोरी रिकामी होईल, असं राज ठाकरे म्हणाले आहेत. महिलांना असे पैसे दिल्यापेक्षा त्यांच्यासाठी नवनवीन उद्योग आणले पाहिजे. त्यांना रोजगार देऊन सक्षम केलं पाहिजे. समाजातील कोणताही घटक फुकट काही मागत नाही. सत्ताधाऱ्यांच्या स्वार्थासाठी योजना असेल तर परिणाम वाईट होतो. राज्य खड्ड्यात घातल्या जात असेल तर ते चुकीचं आहे. ऑक्टोंबरचा हप्ता दिल्यानंतर जानेवारीत तिजोरीत ठणठणाट होऊ शकतो. असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.