उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा राज्यातील सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "गद्दारांना ५० खोके आणि बहिणीला फक्त १५०० रुपये, हे दोन ठग माझा महाराष्ट्र लुटताहेत" असं म्हणत निशाणा साधला आहे. तसेच "मुलगी शिकली प्रगती झाली आणि १५०० देऊन घरी बसवली" असं म्हणत ठाकरेंनी खोचक टोला देखील लगावला आहे.
योजनांचा पाऊस पाडत आहेत. अंमलबजावणीचा दुष्काळ आहे. योजना धडाधड सुरू करत आहेत. आमच्या हक्काचे पैसे ढापले. सरकार स्थापन करताना ५० खोके घेतले.
गद्दारांना ५० खोके आणि बहिणीला फक्त १५०० रुपये. फोडाफोडी, गद्दारी करताना लाज वाटली नाही. आता आमचेच पैसे आम्हाला. हा आमचा महाराष्ट्र धर्म नाही.
कोरोना काळात केलेलं काम पुसून टाकायला पाहत आहेत. तुमच्या भाजपाशासित राज्यांच्या तुलनेत माझ्या महाराष्ट्रातील काम बघा आणि तिथे जर का मी मागे पडलो ना तर मी पुन्हा कधी कोणाला तोंड नाही दाखवणार. मांडा हिशोब. हे आपल्याला लूटत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत लुटली होती स्वराज्यासाठी... हे दोन ठग माझा महाराष्ट्र लूटत आहेत. शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र लूटत आहेत. तोच लुटीचा पैसा वापरून जाहिराती करत आहेत.
सरकारी जाहिरातीवर लोकांचा विश्वास आहे. २०१४ साली केलेलं... चाय पे चर्चा. तेव्हा चहा कितीला मिळायचा आणि आता कितीला मिळतो, दूध किती महागलं, साखर किती महागली, जीएसटी किती लागला यावर चर्चा करा.
गावामध्ये योजना किती आणल्या आणि लाभ किती झाला याचा आढावा घ्या. मुलगी शिकली प्रगती झाली आणि १५०० देऊन घरी बसवली असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी टीकास्त्र सोडलं आहे.