राज्याच्या राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे . नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला उतरती कळा लागत असल्याचे चित्र आहे. शिवसेना फुटीचे सत्र अद्यापही सुरुच आहे.
कोकणात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ठाकरे गटातील नेत्या स्नेहल जगताप यांचा आज प्रवेश होत आहे, दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रात सांगलीत ठाकरे गटाला खिंडार पडणार आहे.
सांगलीतील ठाकरे शिवसेना गटातील जिल्हाप्रमुख, पदाधिकारी हे शिवसेना शिंदे गटात आज पक्ष प्रवेश करणार आहेत. सांगली जिल्ह्यातील ठाकरे गटाला मोठं खिंडार पडणार आहे.
सांगलीचे जिल्हाप्रमुख संजय विभुते, युवा सेना प्रमुख यांच्यासह तालुकाप्रमुख, सरपंच आणि ठाकरे गटाचे अनेक कार्यकर्ते हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांच्या सरकारी मुक्तागिरी या बंगल्यावर आज सायंकाळी पाच वाजता पक्षप्रवेशाचा हा सोहळा होत आहे.
सत्ताधाऱ्यांनी पाच वर्षानंतर दिशा सालियान मृत्यू प्रकरण पुन्हा उकरुन काढल्याने उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे कोंडीत सापडले आहेत. तर दुसरीकडे अनेक कट्टर शिवसैनिक त्यांची साथ सोडत असल्याचे दिसते. आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत याचा फटका ठाकरे गटाला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.