नाशिक (भ्रमर प्रतिनिधी):- नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून अखेर नाशिक महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गिते यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटातून उमेदवारी देण्यात येणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
गणेश गिते हे भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक होते. महापालिकेच्या स्थायी समितीचे दोन वर्ष सभापती म्हणून त्यांनी काम पाहिले. गेल्या दोन वर्षांपासून त्यांना या निवडणुकीत उमेदवारी मिळण्याची अपेक्षा होती. या दृष्टीने त्यांनी तयारी सुरू केलेली होती. मात्र भाजपने गिते यांच्याऐवजी अॅड. राहुल ढिकले यांना उमेदवारी दिली. त्यामुळे त्यांनी महाविकास आघाडीकडे उमेदवारीसाठी प्रयत्न केले.
ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे सुटलेली आहे. थोड्याच वेळात गिते यांचा शरद पवार गटात प्रवेश होईल आणि त्यानंतर लगेच नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघासाठी त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात येईल, असे विश्वसनीय वृत्त आहे.