नाशिक - विधानसभा निवडणुकीसाठी मागील दोन दिवसांपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून या दोन दिवसांमध्ये 321 उमेदवारांनी 618 उमेदवारी अर्ज खरेदी केलेले आहेत .
जिल्ह्यामध्ये विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा निवडणूक उपजिल्हाधिकारी डॉ .शशिकांत मंगरुळे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ व नियुक्त केलेले निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेली आहे. निवडणूक प्रक्रिया 22 ऑक्टोबरपासून सुरू झाल्यानंतर मागील दोन दिवसांमध्ये म्हणजे काल आणि आज जिल्ह्यामध्ये 321 उमेदवारांनी 618 उमेदवारी अर्ज नेले आहेत.
त्यामध्ये नांदगाव मतदार संघामध्ये 32 उमेदवारांनी 54 उमेदवारी अर्ज नेले आहेत, मालेगाव मध्य मध्ये 27 उमेदवारांनी 54 उमेदवारी अर्ज नेले आहेत, कळवण मध्ये ४० उमेदवारांनी 63 उमेदवारी अर्ज नेले आहेत. बागलान मतदारसंघांमध्ये 15 उमेदवारांनी 43 उमेदवारी अर्ज नेले आहेत, चांदवड मतदारसंघामध्ये 21 उमेदवारांनी 31 उमेदवारी अर्ज नेले आहेत, सिन्नर मतदारसंघांमध्ये 22 उमेदवारांनी 29 उमेदवारी अर्ज नेले आहेत, निफाड मतदारसंघामध्ये 27 उमेदवारांनी 40 उमेदवारी अर्ज नेले आहेत, नाशिक पूर्व मध्ये 30 उमेदवारांनी 58 अर्ज नेले आहेत, नाशिक मध्य मतदारसंघांमध्ये 38 उमेदवारांनी 71 उमेदवारी अर्ज नेले आहेत, नाशिक पश्चिम मतदारसंघांमध्ये 37 उमेदवारांनी 68 उमेदवारी अर्ज नेले आहेत, इगतपुरी मध्ये 41 उमेदवारी अर्जांची विक्री झालेली आहेत.
या उमेदवारी अर्जाच्या विक्रीमध्ये जिल्ह्याचे नव्हे तर संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या येवला मतदारसंघांमध्ये छगन भुजबळ हे राज्याचे विद्यमान मंत्री आहेत आणि त्यांच्या विरोधात कोणी लढावे किंवा कसं उमेदवार द्यावा या संदर्भामध्ये खलबत्ते सुरू आहेत. परंतु भुजबळ यांच्या नावाची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने करण्यात आल्यानंतरही अजून पर्यंत एकाही उमेदवाराने उमेदवारी अर्ज नेलेला नाही. भुजबळ उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत परंतु विरोधी पक्षाच्या वतीने अजून पर्यंत तरी कोणीही उमेदवारी अर्जाची खरेदी केलेली नाही.