आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला असून , राज्यात पुन्हा एकदा महायुतीची सत्ता आली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीसाठी हा धक्कादायक निकाल ठरला आहे . दरम्यान, आता मुख्यमंत्री कोण होणार? पुन्हा एकदा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार की भाजपचा मुख्यमंत्री होणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यातच महत्त्वाची बातमी समोर आली आहे, ती म्हणजे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्यात पुन्हा एकदा दोन उपमुख्यमंत्र्यांचा पॅटर्न कायम राहणार आहे. तर मुख्यमंत्री हा भाजपचा होणार असल्याचं समोर येत आहे. भाजपकडून देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार आहेत. मुख्यमंत्रिपदाबाबत बोलताना एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे की आम्ही तीन्ही पक्ष याबाबत बसून निर्णय घेऊ
तसेच, नव्या सरकारच्या शपथविधीबाबत देखील महत्त्वाची माहिती समोर येत आहे, ती म्हणजे नव्या सरकारचा शपथविधी हा सोमवारी किंवा मंगळवारी होणार आहे. शिवाजी पार्क किंवा वानखेडे स्टेडियमवर नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. महायुतीमधील कोणत्या नेत्यांची मंत्रिपदी वर्णी लागणार हे पहाण महत्त्वाचं ठरणार आहे.