विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शरद पवार गटात मोठ्या प्रमाणावर इनकमिंग पाहायला मिळत आहे. त्यामुळे शरद पवारांच्या पक्षाची ताकत चांगलीच वाढतांना दिसत आहे.नाशिक जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शीतल सांगळे यांचे पती आणि सिन्नर पंचायत समितीचे माजी गटनेते उदय सांगळे यांनी आज दुपारी मुंबईत शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांच्या गळ्यात तुतारी चिन्हाचा गमझा घालून त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी पक्षाचे प्रवक्ते जितेंद्र आव्हाड, गजानन शेलार, गोकुळ पिंगळे उपस्थित होते. सांगळे यांचा जनसंपर्क दांडगा आहे. अनेक समाजपयोगी कामेही त्यांनी सिन्नर तालुक्यात केली आहेत.
दरम्यान, उदय सांगळे हे सिन्नर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. मात्र, सध्याचे आमदार माणिकराव कोकाटे यांची उमेदवारी जवळपास पक्की असून त्यामुळे सांगळे यांची उमेदवारी धोक्यात होती. या पार्श्वभूमीवर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केल्याचे बोलले जात आहे. सांगळे यांच्या प्रवेशाने कोकाटे विरुद्ध सांगळे अशी लढत बघायला मिळू शकते.