मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या काही महिन्यांमध्येच महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी पुन्हा एकदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असाच मुकाबला असणार आहे. दरम्यान याच पार्शवभूमीवर आता राजकीय घडामोडींचा वेग आल्याचं पहायला मिळत आहे.
एकीकडे अजित पवारांच्या पक्षातील एकेक नेते शरद पवारांच्या गोटात जाण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे, तर आता दुसरीकडे राष्ट्रवादीला साथ देणाऱ्या मित्र पक्षही त्याच वाटेवरून जात असल्याचं चित्र आहे. राष्ट्रवादीतील बंडानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला साथ देणाऱ्या रिपब्लिकन पक्षाच्या खरात गटाने आता त्यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ते लवकरच शरद पवारांसोबत जाणार आहेत.
रिपब्लिकन खरात गटाचे प्रमुख सचिन खरात यांनी अजित पवार आणि महायुतीची साथ सोडण्याचा निर्णय घेतलाय. महायुतीत दलित आणि मुस्लिमांच्या हिताचे रक्षण होत नसल्याने आपण अजित पवारांची साथ सोडण्याचा निर्णय घेतल्याचं सचिन खरात म्हणाले. शरद पवार आणि सुप्रिया सुळेंसोबत आपण चर्चा केली असून लवकरच पुढचा निर्णय घेणार असल्याचं सचिन खरात यांनी म्हटलंय.