लोकसभा निवडणुकीत जोरदार मुसंडी मारल्यानंतर शरद पवार यांच्या पक्षाचा कॉन्फिडन्स वाढला आहे. आगामी विधानसभेतही याच स्ट्राईक रेटने विजय मिळवायचा असा निर्धारच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला आहे. यासाठी शरद पवार पुन्हा नव्या दमाने मैदानात उतरले आहे. महाराष्ट्रातील वेगवेगळे मतदारसंघ पिंजून काढत त्यांनी अजित पवारांना एकापाठोपाठ एक धक्के देण्यास सुरुवात केली आहे.
अजित पवार गटातील बरेच नेते शरद पवार गटाच्या वाटेवर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर हे शरद पवार गटाच्या वाटेवर आहेत. रामराजे सध्या अजित पवार गटात असले तरी ते लवकरच शरद पवारांसोबत जातील, अशी जोरदार चर्चा रंगली आहे.
दुसरीकडे पुण्यातील जुन्नर मतदारसंघातील अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके हे देखील शरद पवारांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. काही दिवसांपूर्वी बेनके यांनी शरद पवारांची भेट घेऊन त्यांनी मनधरणी करण्याचा प्रयत्न केला, अशा चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र, शरद पवारांनी त्यांच्याकडे फारसं लक्ष दिलेलं नाही.
.
माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांनी आगामी विधानसभेत स्वतः न लढता आपला मुलगा रणजितसिंह यांना लढविण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मुलासाठी त्यांनी शरद पवार यांच्याकडे विधानसभेचं तिकीट मागितलं आहे. बुलडाणाचे डॉ. राजेंद्र शिंगणे हे देखील तुतारी हाती घेणार, अशा दबक्या आवाजात चर्चा सुरु आहेत.
माजी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांचे पुत्र गोकुळ झिरवळ यांनी आधीच शरद पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे पिंपरी चिंचवडमधील अजित पवार गटाचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह १५ माजी नगरसेवक व ६ प्रमुख पदाधिकारी शरद पवार गटात गेले आहेत. एकापाठोपाठ एक नेते साथ सोडत असल्याने अजित पवारांचं चांगलंच टेन्शन वाढलं आहे.