राज्यात उद्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. सर्वांचे लक्ष निकालावर लागले असताना मात्र या निकालाआधीच भाजपला मोठा धक्का बसला आहे. मुंबई भाजपचे सचिव सचिन शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे.सचिन शिंदे हे माहीम विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उपाध्यक्ष आहेत.
मुंबई भाजपचे सचिव सचिन शिंदे यांनी आज दुपारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी सचिन शिंदेंसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थितीत होते. यावेळी माहीमचे उमेदवार महेश सावंतही उपस्थित होते. निकालाच्या आदल्या दिवशी भाजपला पडलेल्या खिंडारामुळे महायुतीमध्ये खळबळ माजली आहे.
दरम्यान , या पक्षप्रवेशानंतर सचिन शिंदे यांनी ठाकरे गटात प्रवेश करण्यामागचे कारण सांगितले. मी गेल्या 20 वर्षांपासून भाजपचा कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. मी पक्षवाढीसाठी काम केलं. पण मला योग्य तो न्याय मिळाला नाही. मी उद्धव ठाकरेंना भेटलो. मी चांगलं काम करण्याचा प्रयत्न करणार आहे. कार्यकर्ते परिस्थितीनुसार माझ्यासोबत उभे आहेत, असे सचिन शिंदे म्हणाले.