राज्यात महिला सुरक्षेचा प्रश ऐरणीवर असताना दर दिवशी महिला अत्याचाराच्या अनेक घटना समोर येत आहेत. बलात्कारासारखे गंभीर गुन्हे सर्रासपणे होत असल्याने कायद्या सुव्यवस्थेचा धाक राहिला आहेकी नाही असा प्रश निर्माण होत आहे. अशीच एक महिला अत्याचाराची घटना समोर आली आहे.
मुंबईतील वांद्रे परिसरात एक खळबळजनक घटना घडली असून वांद्रे टर्मिन्समध्ये एका कुलीने ट्रेनच्या रिकाम्या डब्ब्यात महिलेवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी आरोपीला दीड तासात अटक करण्यात आली. राहुल अब्दुल शेख असे या आरोपीचे नाव आहे. तो विनापरवाना हमाल असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी २ फेब्रुवारीला एक महिला तिच्या मुलासोबत प्रवास करत होती. शनिवारी रात्री त्या महिलेची ट्रेन वांद्रे टर्मिन्समध्ये पोहोचली. वांद्रे टर्मिन्समधून तिची दुसऱ्या ठिकाणी जाणारी ट्रेन होती. ही ट्रेन दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर उभी होती. ती महिला त्या ट्रेनमध्ये चढली. त्यावेळी इतर कोणताही प्रवासी या ट्रेनमध्ये नव्हता. त्याचवेळी एक कुली त्या ट्रेनमध्ये चढला. त्या कुलीने आजूबाजूला कोणीही नसल्याचा गैरफायदा घेत त्या महिलेवर बलात्कार केला. यानंतर तो पळून गेला.
यानंतर त्या महिलेने तात्काळ वांद्रे जीआरपीएफ पोलिसात तक्रार दाखल केली. या गुन्ह्याची माहिती मिळताच पहिल्यांदा महिलेला वैद्यकीय मदत देण्यात आली. यानंतर तात्काळ आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक रवाना झाले. यादरम्यान रेल्वे पोलिसांनी आरोपीला शोधण्यासाठी अनेक सीसीटीव्हीचे फुटेज तपासले आणि आरोपीला अटक करण्यात आली.
वांद्रे टर्मिनसवर मेल गाडीत महिलेवर बलात्कार करणाऱ्या आरोपीच्या अवघ्या दीड तासात मुसक्या आवळण्यात आल्या. राहुल अब्दुल शेख असे त्याचे नाव आहे. तो विनापरवाना हमाल असल्याची प्राथमिक माहिती आहे. तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीला दीड तासात अटक करण्यात आली. सध्या पोलिसांकडून आरोपीची कसून चौकशी सुरु आहे. आरोपीची गुन्हेगारी पार्शवभूमी आहे का याचीही पडताळणी केली जात आहे.
दरम्यान या घटनेनंतर मुंबईतील रेल्वे स्थानकांवरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या घटनेनंतर रेल्वे पोलिस आणि प्रशासनावर टीका होत आहे. प्रत्येक प्लॅटफॉर्मवर सुरक्षारक्षक असतात. मात्र ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा तिथे सुरक्षारक्षक नव्हते का असा प्रश्न उपस्थित होत आहे. यामुळे वांद्र्यातील रेल्वेच्या पोलीस सुरक्षा रक्षकांची चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.