नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- शेजारच्यांनी घराजवळ कुत्री पाळल्यामुळे होणार्या त्रासाला कंटाळून मायलेकांनी एका कुटुंबास मारहाण करीत तोडफोड केल्याची घटना सामनगाव रोड येथे घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी ज्योती मारुती साठे व आरोपी वंश दिलीप सोनवणे व साधनाबाई दिलीप सोनवणे हे नवीन सामनगाव रोडवरील एकलहरा येथील सिद्धार्थनगरमध्ये एकमेकांच्या शेजारी राहतात. फिर्यादी साठे यांनी घराजवळ कुत्री पाळली आहे. या कुत्रीपासून आरोपी सोनवणे यांना त्रास होत आहे.
यावरून आरोपी सोनवणे यांनी कुरापत काढून फिर्यादी साठे यांच्यासह त्यांचे पती व मुलांना शिवीगाळ केली, तसेच वंश सोनवणे याने फिर्यादीच्या घरात घुसून घरातील सामानाची तोडफोड करून नुकसान केले, तर साधनाबाई सोनवणे यांनी साठे कुटुंबीयांना शिवीगाळ करून हाताच्या चापटीने मारहाण केली. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार सानप करीत आहेत.