नाशिक (प्रतिनिधी) :- तब्बल एक कोटी रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पकडलेल्या अहमदनगर एमआयडीसीच्या सहाय्यक अभियंत्यास शनिवारी न्यायालयात हजर केले असता कोर्टाने त्याला दोन दिवसां ची पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत माहिती अशी की अहमदनगर एमआयडीसीत संभाजीनगर येथील ठेकेदाराने पाईप लाईन टाकण्याचे काम केले होते. त्याचे 2 कोटी 66 लाख 99 हजार 244 रुपयांचे बिल मिळण्यासाठी मागील तारखेचे आऊटवर्ड करून त्यावर वरिष्ठांच्या सह्या घेऊन देयक पाठवण्याच्या मोबदल्यात सहाय्यक अभियंता अमित किशोर गायकवाड यांनी बक्षीस म्हणून एक कोटी रुपयांची लाच मागितली होती.
याबाबत तक्रारदाराने नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला असता सहाय्यक अभियंता अमित गायकवाड यास शुक्रवारी नगर जवळील शेंडी येथे सापळा रचून पथकाने रंगेहाथ पकडले होते. आज गायकवाड यास कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्यास दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली. आता सोमवारच्या तारखेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.