दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध नाटककार प्रशांत नारायणन यांचे गुरुवारी तिरुवअनंतपुरम येथील शासकीय रुग्णालयात निधन झाले. प्रशांत नारायणन 51 वर्षांचे होते. त्यांच्यावर फुफ्फुसाच्या आजारावर उपचार सुरू होते.
एक बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध असलेले प्रशांत नारायणन हे लेखक आणि दिग्दर्शक होते. त्यांनी तीन दशकांहून अधिक काळ आपल्या कामाची छाप नाट्यविश्वात निर्माण केली.
प्रशांत यांनी जवळपास ६० नाटकांचे दिग्दर्शन केले असून जवळपास २५ नाटकांची पटकथाही लिहिली आहे. प्रशांत नारायणन यांनी 'छायामुखी' नाटकाचे लेखन केले होते. प्रसिद्ध मल्याळम अभिनेते मोहनलाल आणि मुकेश यांनी या नाटकात काम केले होते, ज्यामुळे दिग्दर्शक म्हणून प्रशांत यांची ख्याती राज्यातील प्रेक्षकांमध्ये आणखीनच वाढत गेली.
नारायणन यांनी 'मणिकर्णिका', 'ताजमहाल' आणि 'कारा' यांसारख्या अनेक प्रसिद्ध नाटकांचे दिग्दर्शनही केले होते. नारायणन यांना २००३ मध्ये सर्वोत्कृष्ट नाट्यलेखनासाठी केरळ संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला होता. या पुरस्कारासोबतच प्रशांत यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते.