राजकारणातील घडामोडींना वेग आला असून सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांच्या पार्शवभूमीवर राजकरण तापले आहे. महायुती सरकार मध्ये या निवडणुकींवरून चांगलाच तिढा निर्माण झाला असून आता मुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस यांनी आणि एक मोठे विधान केले आहे.
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या १७ जागांसाठी विधानपरिषद निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता महायुतीमध्ये जागावाटपावरून जोरदार चर्चा सुरु आहेत. त्यातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निवडणुकीबद्दल अत्यंत महत्त्वाचे आणि मोठे विधान केले आहे. “विधानपरिषदेच्या जागावाटपाबाबत आमची चर्चा सुरू असून आम्ही सर्व पक्ष एकत्र बसून यावर निश्चितच मार्ग काढू,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
मुंबईतील महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवन येथील नूतनीकृत इमारतीच्या लोकार्पण सोहळा आज पार पडला. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, शिक्षण मंत्री दादा भुसे आणि राज्यमंत्री पंकज भोयर यांची प्रमुख उपस्थिती होती. या सोहळ्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विधानपरिषदेच्या निवडणुकीबद्दल भाष्य केले.
विधानपरिषदेच्या निवडणुकांबद्दल आमची सविस्तर चर्चा सुरू आहे. साधारणपणे शिवसेनेसोबत नाशिक आणि संभाजीनगर या दोन जागांवर चर्चा सुरू आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेससोबत पुण्याच्या जागेवरून चर्चा सुरू आहे. आम्ही एकत्र बसून यावर निश्चित मार्ग काढू. अजून अंतिम मार्ग निघालेला नाही, पण यातून निश्चितच सकारात्मक मार्ग निघेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.