बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) पराभवानंतर पक्षात अंतर्गत वाद सुरू झाला आहे. टीएमसी खासदार काकोली घोष यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे, तर टीएमसी-नियंत्रित नगरपालिकांमधील अंतर्गत कलह सुरू झाला असून सामूहिक राजीनाम्यांची लाट आली आहे. याचदरम्यान आता TMC मधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले असून एक मोठी बातमी समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , राज्यात ज्या ज्या महापालिकेत टीएमसीची सत्ता आहे, त्या पालिकेतील एक-एक, दोन-दोन अशा शंभर नगरसेवकांनी राजीमाना दिलाय. मंगळवारी काकोली यांच्यासह तृणमुलचे सहा आमदार बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्या प्रशासनिक समीक्षा बैठकीत सहभागी झाले होते. बंगालच्या राजकीय वर्तुळात याचे विविध अर्थ काढले जात आहेत. काकोली घोष यांनी अलीकडेच जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. भाजप सरकारच्या बैठकीला त्या उपस्थित राहिल्याने विविध चर्चांना उधाण आलं आहे.
काकोली यांच्याशिवाय सुवेंदू अधिकारी यांच्या प्रशासनिक समीक्षा बैठकीला टीएमसी आमदार अनीसुर रहमान बिस्वास, स्वरूपनगर येथून बीना मंडल, हरोआचे आमदार मोहम्मद अब्दुल मतीन आणि बसीरहाट क्षेत्रातील तीन अन्य आमदार सहभागी झाले होते. मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्या बैठकीला उत्तर 24 परगणा, नदिया आणि हुगली जिल्ह्यातील अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. राजकीय जाणकारांनुसार काकोली घोष यांची उपस्थिती केवळ प्रशासकीय नाही, तर राजकीय दृष्ट्या सुद्धा महत्वाची मानली जात आहे.